गडकरी रंगायतनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ‘नटसम्राटाला’ आदरांजली; हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी हिऱ्यांच्या गौरवासाठी संगीतमय कार्यक्रम

ठाणे : सृजनांचा मेळा आणि मान्यवरांची मांदियाळी यांचा अनोखा मिलाफ असलेल्या ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’ शनिवारी (आज) ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. उपस्थितांचे निखळ मनोरंजन करणारा तितकाच आशयपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असणारा असा हा सोहळा असणार आहे. यावर्षी रंगोत्सवात नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना देण्यात येणाऱ्या मानवंदनेसह हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा सन्मान करणारा संगीतमय कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची संधी उपस्थितांना यावेळी मिळणार आहे. तसेच यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना ‘युवोन्मेष’ आणि ‘ठाणे मानबिंदू’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सांस्कृतिक ठाणे शहरातील मानाचा महोत्सव अशी ओळख निर्माण केलेल्या ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’ या महोत्सवाचे यंदा २४ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध आशयघन आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमाची रेलचेल रंगोत्सवात असणार आहे. ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’ सोहळा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजेपासून रंगणार आहे. यंदाचा ‘इंद्रधनु रंगोत्सव’ सोहळा लोकसत्ताच्या सहकार्याने होत आहे. भव्य-दिव्य असलेला हा रंगोत्सव सोहळा दोन सत्रांत रंगणार आहे. पहिल्या सत्रात ‘नटसम्राटाला आदरांजली’ या दृक्श्राव्य, संगीतमय कार्यक्रमाद्वारे  ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या मानवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, सागर तळाशिलकर, संवादिनीवादक अमित पाध्ये आणि मकरंद जोशी यांचा समावेश असणार आहे. तर, रंगोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी प्रतिभावंतांचे योगदान या संकल्पनेवर आधारित ‘माहिरे’ म्हणजेच माय मराठीतले हिरे हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील दिग्गज मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा असा हा संगीतमय कार्यक्रम असणार आहे. कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमात सध्याचे सुप्रसिद्ध गायक कलावंत शरयू दाते, अमृता नातू, जयदीप बगवाडकर, नचिकेत देसाई, कृतिका बोरकर सहभागी होणार आहेत. यंदाच्या रंगोत्सवाचे संहितालेखन आणि निवेदन सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे असून त्यांच्यासोबत अभिनेते पुष्कर श्रोत्री निवेदन करणार आहेत.

गुणीजनांचा गौरव

निरनिराळ्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या तरुणाईला १९९८ पासून इंद्रधनु महोत्सवामध्ये ‘युवोन्मेष’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारांसाठी दरवर्षी त्या त्या क्षेत्रातील तीन तज्ज्ञांची समिती गठीत करून त्यांच्यातर्फे एका व्यक्तीची निवड करण्यात येते. यंदाच्या वर्षी रंगणाऱ्या इंद्रधनु रंगोत्सवात दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना युवोन्मेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रात आश्वासक कामगिरी करणाऱ्या मिताली मिलन या युवा लेखिकेला युवोन्मेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच, यंदाचा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्काराने युवा हार्मोनियम वादक सागर साठे यांना गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ ठाणेकर व्यक्तीला दरवर्षी इंद्रधनुतर्फे ‘ठाणे मानबिंदू’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षणतज्ज्ञ अ.गो. टिळक यांना ‘ठाणे मानबिंदू’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

काय? इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव

 कुठे? गडकरी रंगायतन, ठाणे

कधी? आज, शनिवार,

१८ जानेवारी, सायं ५ वा.पासून