News Flash

तपासचक्र : ‘ब्लाइंड गेम’

बडोद्यात राहणाऱ्या हिम्मत पटेल या व्यापाऱ्याच्या घरात अचानक एक पत्र आलं.

 

व्यावसायिक हिम्मत पटेल यांना एक निनावी पत्र आले. त्यांच्या २४ वर्षांच्या मुलीची अश्लील सीडी असल्याचा दावा करून त्याने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. कोण होता हा आरोपीे? त्याने कशी ही अश्लील सीडी बनवली? खरंच ती मुलगी कोणाच्या जाळय़ात अडकली होती का? की हा एक ‘ब्लाइंड गेम’ होता? तब्बल दहा महिने गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कसे पकडले, त्याची ही कहाणी..

बडोद्यात राहणाऱ्या हिम्मत पटेल या व्यापाऱ्याच्या घरात अचानक एक पत्र आलं. पत्र वाचून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपण काय वाचतोय याचा त्यांच्यावर विश्वासच बसत नव्हता. त्या निनावी पत्रातील मजकूरच तसा स्फोटक होता. पटेल यांची मुलगी किंजल हिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफितींची सीडी आपल्याकडे असून ती परत हवी असल्यास दोन कोटी रुपये द्या, अन्यथा ती छायाचित्रे इंटरनेटवर पसरवू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. हा मजकूर वाचताच पटेल यांना काहीच सुचेनासे झाले.

हिम्मत पटेल हे बडोद्यातले एक मोठे व्यापारी होते. त्यांची २४ वर्षांची मुलगी किंजल पटेल गेल्या वर्षभरापासून उच्च शिक्षणासाठी आली होती. ती मुंबईत भाडय़ाने घर घेऊन एकटी राहत होती. मुक्त विचारांच्या किंजलला घरातल्यांनीही परपंरा किंवा रूढींच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता. अशात हिम्मत पटेल यांना मुंबईहून हे पत्र आलं. मुलींना फसवून, त्यांची अश्लील छायाचित्रे किंवा चित्रफिती इंटरनेटवर टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटना पटेल यांच्या कानावर पोहोचल्या होत्या. त्यामुळे ते पुरते हैराण झाले. त्यांनी ताबडतोब किंजलला बडोद्याला बोलावले आणि तिच्याकडे याबाबत विचारणा केली. पण तिने असं कधीच काही घडलं नसल्याचं निक्षून सांगितलं. या पत्राने तिलासुद्धा जबर धक्का बसला होता.

किंजलवर पूर्ण विश्वास असल्याने हिम्मतभाईंनी पत्राचा विषय बाजूला ठेवला. पण मनात त्याबाबतची चिंता होतीच. अशातच काही दिवसांनी त्यांना धमकी देणारा फोन आला. फोनवरील माणसाच्या बोलण्याने पटेल कुटुंबीय धास्तावले. किंजलची नकली छायाचित्रे इंटरनेटवर पसरली की तिची बदनामी होईल, या भीतीने त्यांनी मुंबई गाठली आणि सहपोलीस आयुक्तांकडे मदत मागितली.

समाजसेवा शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष सावंत आणि पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्याकडे हा तपास सोपवला. जोगेश्वरीच्या संगमनगर येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ पटेल यांना पैसे ठेवण्यास सांगितले होते. पोलिसांनी पटेल कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सापळा लावला. ‘आमचे एक नातेवाईक हसमुखभाई मुंबईत राहतात. त्यांचा क्रमांक सोबत देत आहोत. पैशांसाठी त्यांना संपर्क करा,’ असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांचा नंबर चिठ्ठीत लिहिलेला होता. ते हिम्मत पटेल यांचे नातेवाईक बनून आरोपीशी संपर्क करणार होते.

आरोपी मुंबईतील सार्वजनिक दूरध्वनी बूथवरून फोन करीत होता. पोलीस निरीक्षक पटेल यांचे नातेवाईक बनून त्याच्याशी वाटाघाटी करीत होते. ते जास्तीत जास्त वेळ आरोपीला बोलण्यात गुंतवून ठेवायचे. त्या काळात त्या फोनचा माग घेऊन पोलीस तेथे पोहोचायचे. पण तोपर्यंत आरोपी तिथून निसटून गेलेला असायचा. आरोपीशी वाटाघाटी करून दोन कोटी रुपयांची रक्कम एक कोटी रुपयांवर आणण्यात आली होती. पोलिसांकडे आरोपीला संपर्क करण्याचा दुसरा मार्ग नव्हता. त्याचा फोन येईपर्यंत वाट बघावी लागायची. दरम्यान, या प्रकरणाला सहा महिने उलटून गेले. आरोपी काही पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. पोलिसांनी खूप चौकशी केलीे. किंजलचे कुणाशी वैमनस्य आहे का की तिच्या वडिलांचे कुणाशी व्यावसायिक वैर आहे का हे तपासले. पण काहीच धागा सापडत नव्हता.

खूप दिवसांनी पटेल यांना पुन्हा फोन आला. या वेळी आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी करीत जोगेश्वरी येथील संगमनगर येथील बांधकामाच्या ठिकाणी पैशांची बॅग ठेवण्यास सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. पण त्या दिवशी कोणीच त्या बॅगेकडे फिरकले नाही. दुसऱ्या दिवशी आरोपीनेच पटेल यांना फोन करून ‘दुसरी जागा कळवीन’ असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा फोन केला तेव्हा वाटाघाटी करून खंडणीची रक्कम एक कोटीवरून पाच लाखांवर आणण्यात आली. या वेळी पटेल यांना अंधेरीच्या लोटस पेट्रोलपंपजवळ बोलावण्यात आले. लोटस पेट्रोलपंप हे गजबजलेले ठिकाण आहे. आरोपीला जराही संशय आला असता तर तो निसटला असता आणि पुन्हा कधीच पोलिसांच्या हाती लागला नसता. त्यामुळे पोलिसांनी खूप खबरदारी घेतली. साध्या वेषातले पोलीस तैनात केले. पटेल यांच्या वतीने हसमुखभाई म्हणजेच पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख पैसे घेऊन येणार होते. आरोपीने लाल टी-शर्ट घातलेला असेन, अशी ओळख दिली. त्याप्रमाणे तो संध्याकाळी त्या ठिकाणी आला. पण पोलिसांनी त्याला हटकले नाही. त्याला वाट बघू दिली. बराच वेळ वाट बघून तो एका पीसीओत शिरला व त्याने हसमुखभाई ऊर्फ सुधाकर देशमुख यांना फोन लावला. ‘मी कधीपासून वाट बघतोय’ असे तो म्हणताच सुधाकर देशमुख यांनी ‘ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. लवकरच पोहोचतो’ असे त्याला कळवले. मात्र, या फोननंतर आरोपीची ओळख पटली. त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या.

नयन जाधव (५२) असे या आरोपीचे नाव होते. तो व्यवसायाने शिंपी होता. एकदा रस्त्यात त्याला एक पाकीट सापडले होते. हे पाकीट किंजलचे होते. त्यात किंजलचा फोटो घरचा पत्ता, मोबाइल क्रमांक आदी माहिती होती. त्यावरून जाधवने हा ‘ब्लाइंड गेम’ खेळायचे ठरवले. ही मुलगी तरुण आहे, श्रीमंत घरातील आहे. आपण फोन करून अश्लील सीडी असल्याचे सांगून पैसे उकळू, अशी त्याने योजना बनवली होती. परंतु पोलिसांनी ती उधळून लावली आणि तब्बल दहा महिन्यानंतर आरोपीे गजाआड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:45 am

Web Title: thane investigation news
टॅग : Thane
Next Stories
1 कॉलेजच्या कट्टय़ावर : महाविद्यालयांच्या क्षितिजावरील तारका
2 भविष्याच्या दिशा दर्शविण्यासाठी एनकेटीटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबीर
3 कर्मचाऱ्यांअभावी करवसुली रखडली
Just Now!
X