रायगड जिल्ह्य़ातील जुना पनवेलमध्ये रोहिदास वाडा आहे. या वाडय़ामध्ये अशोक अरुण खरात हा कुटुंबासमवेत राहतो. जेमतेम २९ वर्षांचा हा तरुण. २००९ मध्ये त्याने मुद्रांक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी त्याने शासनाचा अधिकृत मुद्रांक विक्री परवाना घेतला नव्हता. यामुळे तो लपून-छपूनच हा व्यवसाय करीत होता. चाँद नावाची व्यक्ती त्याला शासनाचे मुद्रांक पुरवीत होती. परंतु, मुद्रांक विक्रीतून अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसल्याने तो हताश होता. त्याचवेळी त्याच्या डोक्यात जुन्या तारखांच्या मुद्रांकांच्या विक्रीची कल्पना आली. जुन्या मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी मुद्रांक पेपर महत्त्वाचे मानले जातात. तसेच मालमत्तांचे जुने व्यवहार दाखविण्यासाठी जुन्या तारखांच्या मुद्रांकांना मोठी मागणी असते आणि अशा मुद्रांकांसाठी ग्राहक जास्त पैसेही देण्यास तयार असतात. त्यामुळे त्याने झटपट आणि जास्त पैसे कमवण्यासाठी जुन्या तारखांच्या मुद्रांक विक्रीचा मार्ग निवडला.

मुद्रांक विक्री व्यवसायात असल्यामुळे त्याला मुद्रांकाच्या पेपरबाबत बरीचशी माहिती होती. यामुळे त्याने रबरी शिक्के तयार करणाऱ्या सचिन झांबरे याला गाठले आणि त्याच्याकडून मुद्रांक पेपरवर जुन्या तारखा टाकण्यासाठी रबरी शिक्के बनवून घेतले. त्यानंतर त्याने एका मुद्रांक पेपरवरील तारखा ‘व्हाईटनर’ने नाहीशा केल्या आणि त्या ठिकाणी रबरी शिक्क्य़ाच्या साहाय्याने जुन्या तारखा टाकल्या. परंतु, मुद्रांक पेपरवर जुन्या तारखा टाकल्या तरी कागद मात्र नवीन कोरा दिसत होता. त्यामुळे या कागदाला जुनाटपणा आणण्यासाठी त्याने आणखी एक शक्कल लढविली. चहाच्या पाण्यामध्ये त्याने मुद्रांकाचा नवीन कोरा पेपर बुडविला आणि त्यानंतर तो कागद उन्हात सुकवला. तसेच दुसरा पेपर मातीच्या पाण्यात भिजवून तोसुद्धा सुकविला. या प्रक्रियेमुळे दोन्ही कागदांना पिवळसर रंग येऊन ते जुनाट असल्याचे दिसू लागले. जुन्या तारखांच्या मुद्रांक विक्रीसाठी अवलंबिलेल्या सर्वच कल्पना यशस्वी ठरल्याने तो खूपच खूश झाला होता. त्यानंतर त्याने काही मित्र-मंडळी तसेच अन्य ओळखींच्या मदतीने ग्राहकांना गाठण्यास सुरुवात केली. ग्राहक पाहून तो त्यांच्याकडे पैसे मागायचा. त्यामध्ये त्याला मूळ किमतीपेक्षा त्याला कैकपटीने जास्त पैसे मिळत होते. पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने कार्यालय थाटले नव्हते. तो प्रत्यक्षात जाऊन ग्राहकांना भेटायचा. या भेटीनंतर तो ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मुद्रांक पेपर पुरवायचा. काहीवेळेस तो मुद्रांक पेपरवर मजकूर टाकण्याचेही काम करायचा आणि त्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घ्यायचा. हळूहळू त्याची हिंमत वाढू लागल्यानंतर तो मुद्रांकाला सत्यप्रतही करून देण्याचे काम करू लागला. त्यासाठी त्याने काही वकिलांचे रबरी शिक्के स्वत:कडे ठेवले होते. त्याच शिक्क्यांच्या आधारे मुद्रांक पेपरला सत्यप्रत करीत असे. जुन्या मुद्रांकासाठी त्याला ग्राहक मिळत असल्याने त्याचा व्यवसाय तेजीत सुरू होता.

एके दिवशी तो ठाण्यातील तलावपाळी परिसरात मुद्रांकाच्या विक्रीसाठी आला आणि ही माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार आणि भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास घेवारे यांच्या पथकाने तलावपाळी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक अरुण फणसेकर, पोलीस हवालदार शरद तावडे, भगवान थाटे, उदय देसाई, गोविंद सावंत, गणेश वाघमोडे, पोलीस नाईक जयकर जाधव यांचा समावेश होता. या पथकाने त्याच्याकडे तपासणी केली असता, त्याच्याकडे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे तब्बल ४४७ मुद्रांक आणि विविध प्रकारचे ३३ रबरी शिक्के सापडले. त्यामध्ये ५०० रुपये दराचे १७८ मुद्रांक, शंभर रुपये दराचे २४३ मुद्रांक, ५० रुपये दराचे ३६ मुद्रांक आदीचा समावेश होता. यामुळे या मुद्रांकासंबंधी पथकाने त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये त्याने या व्यवसायाची कबुली पथकाला दिली. त्याच्याकडे सापडलेल्या रबरी शिक्क्य़ांमध्ये काही शिक्के वकिलांचे होते. या वकिलांपैकी बरेचजण यात नसल्याची बाब तपासात पुढे आली. त्यामुळे पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि त्या्च्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरामध्ये जुन्या काळातील ७५ पैसे, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि २० रुपये किमतीचे मुद्रांक सापडले. या शिवाय, ब्रिटिशकालीन एक रुपया आठआणा दराचेही मुद्रांक सापडले. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे. अशोकला अशा प्रकरणात यापूर्वीही दोनदा अटक झाली आहे. रत्नागिरीतील खेड आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार सचिन झांबरे आणि चाँद हे दोघे पसार असून पोलीस त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.