‘शब्दयात्रा’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद 

उत्तम आणि सकस साहित्य अभिवाचनाच्या शब्दयात्रा उपक्रमाने आता चांगलेच बाळसे धरले असून, गेल्या रविवारी निकिता भागवत यांनी विनोबा भावे लिखित आणि राम शेवाळकर संपादित शिक्षण विचार या पुस्तकातील विचारधन अत्यंत प्रभावी पद्धतीने श्रोत्यांपुढे मांडले. अर्धशतकापूर्वीच्या या लेखनात प्रचलित शिक्षण पद्धतीतील त्रुटी आणि त्यावरील उपायांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ साक्षर न बनता, साधक आणि सार्थक बनावे. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी या दोहोंनी काय करावे याचे मार्मिक विवेचन या पुस्तकात आहे. आजही भौतिक साधने वगळता, परिस्थितीत फारसा फरक नाही. त्यामुळे पुढे येऊ  घातलेल्या काळाचे कल्पनाचित्रच जणू विनोबांनी रेखाटले आहे असेच वाटत राहते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मी..मिठाची बाहुली’ या वंदना मिश्र लिखित आत्मकथनाचे अभिवाचन झाले.

पूर्वाश्रमीच्या सुशीला लोटलीकर या जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नाटय़क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुशीलाताईंना मो. ग. रांगणेकर, पाश्र्वनाथ आळतेकर अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. पुढे घरची जबाबदारी समर्थपणे पेलता यावी यासाठी त्यांनी गुजराती नाटक कंपनीमध्ये नोकरी केली. त्या अनुषंगाने मुंबई, तेथील समाजजीवन, नाटय़ आणि संगीत क्षेत्रातील घडामोडी यांचे लोभस चित्रीकरण या पुस्तकात आहे.  या अभिवाचनाची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांचे होते. उदय नेने आणि मानसी कुलकर्णी या प्रतिथयश कलाकारांनी अत्यंत हळुवारपणे हे आत्मकथन श्रोत्यांसमोर उलगडले.