ठाणे रेल्वे पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रवाशाची अडीच लाखांचा ऐवज असलेली बॅग पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या स्वाधिन केली आहे. ठाणे स्थानकावर नेरूळ येथील देसाई दाम्पत्याकडून विसरली होती. त्या बॅगमध्ये अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज होता. ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे त्यांना ही बॅग परत मिळाली आहे. हा सर्व प्रकार शुक्रवारी घडला आहे. ठाणे पोलिसांनी बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज त्यांच्या स्वाधीन केला. ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांनी याबद्दलची माहिती दिली.

नेरूळ येथील एका दाम्पत्याकडून शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक-९ वर ही बॅग विसरली होती. लोकल फलाटावर लागताच घाईगडबडीत चढताना संचिता या आपली हॅण्डबॅग विसरल्या. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान अरुण कुमार आणि विक्रमाजित या दोघांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी ती बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी ही बाब तातडीने सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मेघे यांना सांगितली.

बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत आठ हजार ५०० रुपयांची रोकड, मंगळसूत्र, नेकलेस, दोन बांगड्या, दोन कानांतील रिंगा, दोन रिंगा, चार पेंडण्ट आणि एटीएमकार्ड असा ऐकूण जवळपास अडीच लाखांचा ऐवज होता. पोलिसांनी तात्काळ बॅगमधील सामानावरून दाप्मत्याचा शोध घेतला आणि बॅग त्यांच्या स्वाधीन केली.