ठाणे जिल्हा क्षेत्रात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. यामुळे ठाणे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ११ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू केले आहेत.

शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी लॉकडाउनची घोषणा, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू केले आहेत. तसेच या लॉकडाउन आदेशांना वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे.

‘मिशन बिगीन अगेन’च्या आदेशांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या आदेशानुसार करोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे व विशिष्ट क्षेत्रात प्रतिबंध लागू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आलेले आहेत.

तथापी, ठाणे जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. मिशन बिगीन अगेन आदेशानुसार अनेक प्रकारच्या सवलती सुरु झाल्याने रस्ते, बाजार परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचे प्रतिबंध पुन्हा लागू करणे आवश्यक झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

महानगरपालिकांच्या हददींमध्ये हे आदेश लागू असणार नाहीत. तिथे संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी काढलेले लॉकडाउनचे आदेश लागू राहतील, असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले.