उपरोक्त विषयावरील ३० मार्च रोजीच्या ‘लोकसत्ता’मधील वृत्त हे तंतोतंत खरे आहे. फडके रोडवरील टपाल कार्यालयात मी व माझी मुलगी गेलो होतो. या टपाल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जाताना अनेक अडथळ्यांना पार करावे लागते. या कार्यालयात सोयी-सुविधांची वानवा आहे. कार्यालयात वृद्धांपासून येणाऱ्या प्रत्येकाला समस्यांचाच सामना करावा लागतो.

आम्हाला केवळ रेव्हेन्यू स्टॅम्प हवे होते, पण त्यासाठीही बराच कालावधी वाट बघावी लागली. हे टपाल कार्यालय म्हणजे कोंडवाडाच होता. आपलेच पैसे मिळवायला किंवा एखाद्या किरकोळ कामासाठी सरकारी कार्यालयात जाणे नकोसे वाटते. पण पर्याय नसल्याने सरकारी कार्यालयामधील या अनागोंदीचा सामना करावा लागतो. सरकारी कार्यालयात केवळ प्रशिक्षित कर्मचारी असून फायदा नाही, तर सर्वसामान्यांना सुविधा देणेही आवश्यक आहे. मोठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गरिबांच्या या त्रासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

-माधुरी अनिल वैद्य, ओक बाग, कल्याण.

 

बदलापूर ८.११ची लोकल त्रासदायक

बदलापूर येथून सकाळी ८.११ला सुटणारी लोकल होम फलाटावरून पूर्ववत सोडण्यात यावी. पूर्वी ही लोकल सकाळी ७.४७ ला फलाटावर येत होती. त्यामुळे वर्षोनुवर्ष या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी हा सोयीस्कर पर्याय होता. कोणतीही घाई-गडबड न करता प्रवासी फलाटावर लोकल पकडण्यासाठी येत असत. पण रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करताना आता ही लोकल फलाट क्रमांक ३ वरून सोडण्याचा निर्णय घेतला. या फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांची तारांबळ उडते. तसेच गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. यासाठीच ही लोकल पूर्ववत वेळेनुसार व दादपर्यंत सोडण्यात यावी, ही विनंती.

-के. डी. कांबळे, शिवाजी चौक, बदलापूर (पूर्व).