महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने ठाण्यातील श्रीरंग, वृंदावन, आनंद पार्क, ऋतु पार्क विभागातील तीन वीज भरणा केंद्रे बंद केली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वृंदावन सोसायटी, श्रीरंग शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अरमान रेसिडेन्सिमधील केंद्रे बंद करण्यात आली असून फक्त वृंदावन सोसायटीतील ३९/३ इमारतीमधील भरणा केंद्र सुरू आहे. एवढय़ा मोठय़ा परिसरासाठी एकच केंद्र असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ऑनलाइन भरणा न करता येणाऱ्या लोकांची मोठीच गैरसोय होत आहे. वेळेवर वीज देयक भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना उद्धट उत्तरे मिळतात. या सर्वाची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आणखी केंद्रे पूर्ववत सुरू केल्यास नागरिकांच्या दृष्टीने सोईचे ठरेल.

-ज्योती कुलकर्णी, ठाणे</p>

रुग्णालयाची समस्या जशीच्या तशी

ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या घोषणा होत आहेत. पण पाणी, रस्ते, रुग्णालय समस्या या जशाच्या तशा आहेत. त्यात काहीही बदल झालेला नाही. ठाणे शहरातील विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय हे सिव्हिल हॉस्पिटल या नावाने लोकप्रिय आहे. या रुग्णालयात असुविधा जास्त आहे. येथे ओपीडीमध्ये जे रुग्ण येतात. त्यांच्यासाठी शौचालय उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या परिसरामध्ये अस्वच्छतेचा अभाव आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातील नागरिक इलाज करून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर येतात. दिवसभरात ओपीडीत कमीतकमी २०० रुग्ण नियमित येत असतात. अशा या रुग्णांना कोर्ट नाक्यावरील रुग्णालयात जावे लागते. पूर्वी येथे शौचालय होते, मात्र ते तोडले असून येथे नवीन शौचालय होणार असल्याचे येथील कर्मचारी सांगतात. पण ते होणार कधी असा प्रश्न उपस्थित झाला असून येथील काम कासवगतीने चालू झाले आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या या रुग्णालयात आहे. वॉटर फिल्टरही निकामी झाला आहे त्यामुळे शुद्ध पाण्याचीही खात्री नाही. मृतदेह ठेवण्यासाठी जागेची कमतरता नाही.

-विजय वागळे, ठाणे