मार्चअखेपर्यंत अर्थसंकल्प मंजूर होण्याची शक्यता धूसर

ठाणे : महापालिका प्रशासनातील वादामुळे यंदा उशिरा सादर झालेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आता नवीन आर्थिक वर्षांतच मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात स्थायी समितीपुढे सादर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पास ३१ मार्चपूर्वी सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी देण्याची योजना सत्ताधारी शिवसेनेने आखली होती. मात्र ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पालिकेतील सर्व सभा व बैठका रद्द करण्यात आल्या असल्याने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होणे कठीण बनले आहे.

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे फेब्रुवारी अखेपर्यंत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नव्हता. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने तातडीने गेल्या काही दिवसांत स्थायी समितीच्या बैठका आयोजित केल्या असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करून काही बदल सुचविले आहेत. मात्र, त्यास अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ही बैठक लवकरच घेऊन त्यात अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता होती.  असे असले तरी ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली असून त्याचबरोबर अर्थसंकल्पीय सभाही अद्याप आयोजित केलेली नाही. राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत सर्वच कार्यक्रम रद्द केले असून यामुळे पालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार नसल्याचे चित्र आहे.

‘स्थायी’ने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करूनही बैठक घ्यायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. ही बैठक झाली नाहीतर स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल,’ अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.