News Flash

भिवंडी, भाईंदरसाठी ठाणे ‘जलदूत’

भातसा धरणातून पाणी आणून दोन्ही शहरांना पुरवणार; ठाणे महापालिकेलाही जादा पाणी मिळणार

भिवंडी, भाईंदरसाठी ठाणे ‘जलदूत’
भिंवडीतील तीव्र पाणीटंचाई असून रामनगर, गायत्रीनगर या परिसरात टँकरद्वारे पाणी मिळवण्यासाठी पाण्याच्या पिंपांची भलीमोठी रांग रोज लागत आहे.

भातसा धरणातून पाणी आणून दोन्ही शहरांना पुरवणार; ठाणे महापालिकेलाही जादा पाणी मिळणार
तीव्र अशा पाणीटंचाईमुळे राज्यभर दुष्काळदाह जाणवू लागला असताना भातसा धरणातून भिवंडी-निजामपूर महापालिकेस काही वर्षांपूर्वी मंजूर झालेला सुमारे ६० ते ७० दक्षलक्ष लिटर इतक्या अतिरिक्त पाण्याचा साठा टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी शहरास वितरित करण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला असून पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या या परिसरातील रहिवाशांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाटबंधारे विभागाने भिवंडी शहरासाठी तब्बल चार वर्षांपूर्वी पाण्याचा हा अतिरिक्त कोटा मंजूर केला होता. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरात पुरविण्यासाठी आवश्यक यंत्रणाच उपलब्ध नसल्याने पाणीसाठा मंजूर होऊनही ते नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होत नव्हते. भिवंडी महापालिकेचे हे दुखणे लक्षात घेऊन भातसा धरणातील हे पाणी टेमघपर्यंत आणण्याची तयारी ठाणे महापालिकेने दाखवली असून त्या बदल्यात ठाणे आणि मीरा-भाईंदर या शहरांनाही भिवंडीच्या वाटय़ाचे पाणी पुरविले जाणार आहे.
ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेस ‘स्टेम’ प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांत भिवंडी आणि मीरा-भाईंदर या दोन्ही शहरांची लोकसंख्या काही लाखांनी वाढली आहे. त्या तुलनेत या दोन्ही शहरांना प्रतिदिन होणारा प्रत्येकी ८० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वाढीव पाणीपुरवठय़ासाठी याचना सुरू केली आहे. दुसरीकडे, भिवंडी महापालिकेला पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी भातसा धरणातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याचा साठा मंजूर केला होता. मात्र, या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरापर्यंत आणणारी यंत्रणा भिवंडी महापालिकेकडे नसल्याने हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते.
‘स्टेम’ प्राधिकरणाच्या एका बैठकीत भिवंडी महापालिकेस मंजूर असलेल्या अतिरिक्त पाण्याचा विषय चर्चेस आला असता ठाणे महापालिकेने या पाण्यावर प्रक्रिया करणे तसेच भिवंडी शहरापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल तसेच भिवंडी महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यातील संयुक्त बैठकीत पाणीवाटपाचे धोरण जवळपास पक्के होत आले आहे. अतिरिक्त पाण्यासाठी आवश्यक असलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा भरणा भिवंडी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केला नसल्याने यासंबंधीचा करार अद्याप झाला नव्हता. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंबंधी मध्यस्थी करत कराराच्या मूळ रकमेवर आकारले गेलेले दंडाचे शुल्क माफ करण्याची विनंती जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे केली होती. पाटबंधारे विभागाने ही विनंती मान्य केली असून त्यामुळे नियोजनाअभावी धरणात अडून राहीलेले पाण्याचे पाट ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदरच्या दिशेने वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रत्येकी २० दशलक्ष लिटर
पाणीवाटपाच्या नव्या सूत्रानुसार पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या कपातीचे सूत्र लक्षात घेऊनही भातसा धरणातून ६० एमएलडी इतक्या पाण्याचा उपसा ठाणे महापालिका करणार आहे. या पाण्यावर टेमघर येथे प्रक्रिया करून ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर महापालिकेस सम प्रमाणात पाण्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. सद्य:स्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना ६० एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याने किमान दीड ते दोन लाख नागरिकांना किमान दिलासा देण्यात आम्ही यशस्वी होऊ शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 12:41 am

Web Title: thane mahapalika gets extra water
Next Stories
1 भाईंदरचा कचरा उत्तनला नको!
2 भाईंदरमध्ये कंत्राटी कामगारांचे असहकार आंदोलन
3 आता मोर्चा खोपटकडे!
Just Now!
X