|| आशीष धनगर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वृक्षसंपदेचे नुकसान:- हरित ठाण्याचा संकल्प करत नव्याने करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणावर लाखो रुपयांचा खर्च मांडणाऱ्या ठाणे महापालिकेचे शहरातील सध्याच्या वृक्षसंपदेच्या संरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसात यंदा ठाणे महापालिका हद्दीत ६३२ झाडे उन्मळली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. झाडांच्या फांद्यांची वेळेवर छाटणी न होणे तसेच मुळांभोवती काँक्रीट तसेच पेव्हर ब्लॉकचा थर उभा केल्याने अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून झाडांची ही पडझड समोर आली आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ठाणे शहरात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत ३७२ वृक्ष उन्मळून पडले होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्ष धारातिर्थी पडत असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिक तसेच संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीने हे प्रमाण कमी व्हावे यासाठी ठोस उपाय आखले जातील, असे आश्वासन ठाणेकरांना दिले होते. पावसाळ्यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर वृक्षांच्या फांद्यांची छाटणी मोहीम हाती घेतली जाईल तसेच काँक्रीटीकरणाचा फास मुळांभोवती नसेल यासाठी विशेष दक्षता घेतली जाईल, अशा घोषणाही करण्यात आल्या होत्या. असे असताना यावर्षी ६३२ वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.

गेल्या वर्षी याच तीन महिन्यांत ३७२ वृक्ष उन्मळून पडले होते. तर १७९ वृक्षांची धोकादायक म्हणून नोंद करण्यात आली होती. दरवर्षी मे महिन्यात महापालिकेकडून सुरू करण्यात येणाऱ्या वृक्ष छाटणीच्या कामांना यंदा दिरंगाई झाली होती. जून महिन्यात वृक्ष पडल्याच्या काही घटना उडकीस आल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाने हे काम हाती घेतले होते. वृक्ष छाटणीला झालेला विलंब आणि शहरातील वाढलेले काँक्रीटीकरण यामुळे यंदा वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब चिंताजनक असल्याचेही पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी अनुराधा बाबर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील काँक्रीटीकरणाच्या कामांमध्ये वाढ झाली असून त्याचा परिणाम वृक्षांच्या मुळांवर होत असल्याने वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच यंदा महापालिकेतर्फे वृक्ष छाटणीच्या कामांना विलंब झाल्याने या घटनांमध्ये वाढ झाली आहे.-ऋषभ चौधरी, पर्यावरण अभ्यासक