ठाणे शहरातील मॉल्समधील ‘डिस्काऊंट सेल’च्या ओढीने आठवडय़ाच्या सुटीच्या दिवशी गर्दी करणाऱ्या ग्राहकांचा फटका आता शहराच्या वाहतूक व्यवस्थेला बसू लागला आहे. शहरातील मॉलबाहेर शनिवारी, रविवारी होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे या परिसरात आणि पर्यायाने अन्य भागांत प्रचंड वाहतूक कोंडी होत असून येथील वाहनगर्दीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दैना उडत आहे. त्यामुळे यापुढे असे खरेदीउत्सव भरवण्याच्या १५ दिवस आधी वाहतूक पोलिसांची परवानगी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागातील सूत्रांनी सांगितले.
ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शनिवारी, रविवारी विशेष सवलतींचा खरेदीउत्सव आयोजित करण्यात आला होता. तसेच ठाण्यातील अन्य मॉलमध्येही काही ना काही निमित्ताने ‘डिस्काऊंट सेल’ सुरू होते. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या मॉल्समध्ये ग्राहकांची मोठी झुंबड उडाली. वाहतूक पोलिसांच्या अंदाजानुसार या दोन दिवसांत मॉलच्या परिसरात ४० हजारांहून अधिक वाहने नोंदवली गेली. त्यापैकी अनेक ग्राहकांनी महामार्ग आणि सेवा रस्त्यांवर वाहने उभी केली होती. तसेच मॉलच्या दिशेने वाहने घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी होती. त्यामुळे शहरातील महामार्ग आणि सेवा रस्त्यावरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. ही वाहतूक कोंडी भेदण्यासाठी वाहतूक पोलिसांना एक सहाय्यक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक आणि ६० कर्मचारी तैनात करावे लागले होते.
या अनुभवातून धडा घेत वाहतूक पोलिसांनी आता थेट मॉलच्या खरेदीउत्सवांवरच वक्रदृष्टी केली आहे. यापुढे कोणताही सेल ठेवायचा असेल तर किमान १५ दिवस आधी वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागेल, अशी तंबी वाहतूक पोलिसांनी व्यवस्थापनांना दिली आहे. मॉलमध्ये खरेदीउत्सव भरवण्यापूर्वी मॉल व्यवस्थापनांना गर्दीचे आणि वाहनांचे नियोजन कसे करणार, याची माहिती द्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापनाला स्वत:चे ‘वॉर्डन’ नेमावे लागतील, अशी नोटीस सर्व मॉल व्यवस्थापनांना पाठवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक विभागाची परवानगी न घेताच सेल ठेवला तर त्या संबंधित मॉलचा परवाना रद्द करण्यासाठी वाहतूक पोलीस ठाणे महापालिकेकडे अहवाल पाठविणार आहेत, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.
‘मैदानात व्यवस्था करा’
मॉलमध्ये वाहनतळाची पुरेशी पार्किंग व्यवस्था नसेल तर त्यांनी शहरातील मैदाने भाडय़ाने घ्यावीत. तसेच या मैदानापासून मॉलपर्यंत ग्राहकांसाठी शटल सेवा ठेवावी, असा पर्यायही वाहतूक शाखेने मॉल व्यवस्थापनापुढे ठेवल्याचे करंदीकर यांनी सांगितले.
मॉल मोठे, पार्किंग छोटे
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत अनेक भव्य मॉल उभे करण्यात आले आहेत. या मॉलमध्ये सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी होते. मात्र, बहुतांश मॉलमध्ये वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. अनेक मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांनाही ‘पार्किंग शुल्क’ आकारले जाते. त्यामुळे ग्राहक मॉलबाहेरील रस्त्यावरच वाहने उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी नित्यनेमाने होत असते.