घरातील १४ जणांची सुऱ्याने गळा चिरून हत्या करत असताना हसनैनला इतरांकडून प्रतिकार होऊ शकला नाही. त्यामुळे या हत्येमागचे गूढ आणखी वाढले आहे. हसनैन याने सुऱ्याने वार करण्यापूर्वी सर्वाच्या जेवणामध्ये विषारी पदार्थ टाकला असावा आणि त्यानंतर त्या धुंदीत असताना त्याने सुऱ्याने सर्वावर हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच या दिशेनेही पोलीस तपास करण्यात येत आहे.

गुन्हे मालिका आवडीच्या..
विविध वाहिन्यांवरील गुन्हेविषयक मालिका पाहण्याची हसनैन याला फारच आवड होती. तसेच क्रिकेटचे सामने व बातम्या पाहण्यातही त्याला रुची होती. मात्र त्या तुलनेत गुन्हेविषयक मालिका त्याच्या फार आवडीच्या होत्या, अशी माहिती हसनैनच्या काही नातेवाइकांनी दिली.

नेत्यांची मदतीसाठी धावपळ..
कासारवडवली गावातील हत्याकांडानंतर ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ..तर वाचले असते
हसनैनने शनिवारी ठेवलेलेल्या दावतच्या कार्यक्रमाला त्याच्या बहिणींचे पती उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे हे बचावले आहेत. हे सर्वजण दावतसाठी उपस्थित राहिले असते तर हसनैनच्या कृत्याला त्यांनी नक्कीच विरोध केला असता व दुर्घटना घडली नसती, अशी चर्चा परिसरात होती.

कोपरखैरणेत अंत्यविधी
हसनैनच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सात जणांवर कोपरखैरणे येथील दफनभूमीत रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. हसनैनच्या बहिणी शबिना खान व मारिया फक्की व त्यांची मुले हे सर्वजण कोपरखैरणेतील रहिवासी होते.

हत्याकांडातील मृतांची नावे
हसनैन अनवर वरेकर (३५), जबीन हसनैन वरेकर (२८, पत्नी), मुबतशिरा हसनैन वरेकर (६, मोठी मुलगी), उमेरा हसनैन वरेकर (तीन महिने, लहान मुलगी), अनवर वरेकर (५५, वडील), असगडी अनवर वरेकर (५०, आई), बतुल अनवर वरेकर (३०, बहीण), शबिना शौकत खान (३५, बहीण), अनस शौकत खान (१२, भाची), सादिया शौकत खान (१६, भाची), अलीहसन शौकत खान (५, भाचा), मारिया अरफान फक्की (२८, बहीण), उमेर अरफान फक्की (७, भाचा), युसूफ अरफान फक्की (४, भाचा), अरसिया सोजेफ भरमल (५ महिने, भाची)

कॅमेरामनचा आकस्मिक मृत्यू
कासारवडवली येथील भीषण हत्याकांडाच्या चित्रीकरणाचे काम करीत असताना ठाण्यातील कॅमेरामन रतन भौमिक (३२) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रतन एका वृत्तवाहिनीसाठी कॅमेरानन म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. कासारवडवली हत्याकांडातील मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात येणार असल्यामुळे त्याचे वार्ताकन करण्यासाठी ते सकाळीच रुग्णालयात आले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रतन यांना हृदयविकाराचा त्रास होता. वर्षभरापूर्वी त्यांची अँजिओग्राफीही झाली होती. रतन यांच्या पार्थिवावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.