ठाणे महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. क्वारंटाइन सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्याचे त्याच्या निवृत्तीच्या दिवशीच करोना संसर्गामुळे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या प्रकरणामध्ये आता कामगार संघटनांनी मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या या कर्मचाऱ्याचा भाईंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरवर अन्न वाटपाचे काम देण्यात आलं होतं. मागील अनेक आठवड्यांपासून हा कर्मचारी या क्वारंटाइन सेंटरमध्ये काम करत होता. त्याचदरम्यान १८ मे रोजी या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. या व्यक्तीवर मागील १३ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र रविवारी, ३१ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास निधन झालं. सर्व परिस्थिती सामान्य असती तर हा कर्मचारी याच दिवशी सेवेमधून निवृत्त होणार होता. मात्र त्याआधीच करोनामुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

महानगरपालिका कामगार संघटनेचे प्रमुख रवी राव यांनी या प्रकरणात ठाणे महापालिकेच्या आयुक्त विजय सिंघल यांना  एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या या कर्मचाऱ्याला संभाव्य करोनाबाधितांच्या थेट संपर्कात येण्यासंदर्भातील काम का देण्यात आलं होतं असा सवाल उपस्थित केला आहे. “वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होऊन ज्या व्यक्तीने आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे अपेक्षित होते त्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. याची नुकसान भरपाई म्हणून त्याच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत आणि वारसाला सरकारी नोकरी देण्यात यावी. तसेच कोणत्या परिस्थितीमुळे या व्यक्तीचे निधन झाले यासंदर्भात पालिकेने चौकशी करावी,” अशी मागणी राव यांनी आपल्या पत्रामधून केली आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करुन ५८ वर्षाच्या व्यक्तीला या कामासाठी नियुक्त करण्याची चूक प्रशासनाची आहे. या चुकीसाठी आणि त्यामुळे या कर्मचाऱ्याला प्राण गमवावा लागल्यामुळे भरपाई देण्यात यावी असा युक्तीवादही राव यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.