News Flash

वाल्मीकीचा वाल्या कोळी झाला!

ठाण्यातील कासारवडवली येथे १९९५-९६ च्या काळात केवळ सातवीपर्यंत शाळा होती.

ठाण्यातील हत्याकांडातील हसनैन वरेकरच्या शिक्षकाची भावना

ठाण्यातील  कासारवडवली येथील संपूर्ण कुटुंबाची हत्या करणारा हसनैन वरेकर शालेय जीवनात ‘शिक्षक प्रिय’ विद्यार्थी होता. राबोडी येथील अंजुमन खैरूल इस्लामिक शाळेत शिकलेल्या हसनैन याने शालेय जीवनामध्ये शिक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्याच्या शिक्षकांसाठी हा मोठा धक्कादायक प्रसंग असल्याचे त्याचे मराठी विषयाचे शिक्षक मुजिब शेख यांनी सांगितले. शाळेत असताना वाल्या कोळ्याचा वाल्मीकी झाल्याची गोष्ट त्याला सांगितल्याची आठवण शेख यांनी सांगितली. मात्र हसनैनच्या आयुष्यातील घटना मात्र वाल्या कोळ्याच्या गोष्टीच्या अगदी उलटी असल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली. अभ्यासू हसनैन वाल्या कोळ्याप्रमाणेच गुन्हेगार ठरल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठाण्यातील कासारवडवली येथे १९९५-९६ च्या काळात केवळ सातवीपर्यंत शाळा होती. त्यामुळे कासारवडवली येथून हसनैन वरेकर पुढील शिक्षणासाठी राबोडीतील अंजुमन खैरूल इस्लामिक शाळेत शिकण्यासाठी येत होता. त्याचे मराठीचे शिक्षक मुजिब शेख यांनी हसनैनच्या काही आठवणी सांगितल्या. तो अत्यंत अभ्यासू विद्यार्थी होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व त्याच्याकडे देण्यात आले होते. कासारवडवली भागातील मुलांना सकाळी लवकर शाळेत घेऊन येण्यासाठी तो शिक्षकांना मदत करत असायचा. त्यामुळे शिक्षकांशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. शाळेमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने तो मराठीचा शिक्षक झाला होता. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाच्या काही गोष्टी शिकवल्या होत्या, अशा आठवणी त्याचे शिक्षक मुजिब शेख यांनी व्यक्त केल्या.

शाळेत गोष्ट सांगितलेली

त्याला शाळेत वाल्या कोळ्याचा वाल्मीकी झाल्याची गोष्ट सांगितली होती. वाल्या कोळ्याच्या कुटुंबीयांनी पापाचे भागीदार होण्याचे नाकारले म्हणून त्याचा वाल्मीकी झाला. मात्र हसनैन याने पुण्य कमविण्याच्या ईर्षेने हत्या केल्याचे ऐकून वाल्मीकीचा वाल्या कोळी झाल्यासारखे जाणवल्याचे शेख यांनी सांगितले.

तीन महिन्यांपुर्वी अखेरची भेट..

तीन महिन्यांपूर्वी एका लग्न समारंभामध्ये शेख यांची हसनैन याच्याशी भेट झाली होती. त्यावेळी त्याने आपली शैक्षणिक प्रगती सांगण्याबरोबरच करिअरमधील यशाचा उल्लेख शेख यांच्याकडे केला होता. त्यावेळी त्याने शालेय आठवणींना उजाळा दिल्याचे शेख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 1:27 am

Web Title: thane man kills 14 of own family members in cold blood hangs himself
टॅग : Thane
Next Stories
1 आकाशगंगा रस्त्यावर वाहने थांबविण्यास मनाई
2 कचरा सपाटीकरण दुपापर्यंत बंद
3 जमीन मालकाची फसवणूक करणाऱ्या विकासकावर गुन्हा
Just Now!
X