शेअर बाजारातील व्यवहार उघड; ६८ लाखांच्या कर्जाचा संशय
घरातील चौदा जणांची हत्या करून स्वत: आत्महत्या करणाऱ्या हसनैन वरेकर हा शेअर बाजारात नियमित व्यवहार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून डिसेंबरअखेपर्यंत त्याने तब्बल साडेचार कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या उलाढालीमध्ये मात्र त्याला नेमका फायदा किंवा तोटा किती झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
यासंबंधीचा सविस्तर तपशील मिळविण्यासाठी लेखापालाची (सीए) मदत घेतली जात असून त्यांच्याकडे हसनैनच्या शेअर बाजारातील व्यवहाराचा लेखाजोखा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. कासारवडवली गावातील हसनैन वरेकर याला शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे त्याच्यावर ६८ लाखांचे कर्ज झाल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची पथके त्याच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती गोळा करीत होते. या तपासादरम्यान शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी त्याने घोडबंदर येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत डिमॅट खाते उघडले होते.

शिकवणीमुळे झोएर बचावला
हसनैन वरेकर याने दावतसाठी तिन्ही विवाहित बहिणींना घरी बोलाविले होते. यामुळे कोपरखैराणेमध्ये राहणारी त्याची बहीण मारिया ही दावतसाठी हसनैनच्या घरी निघाली होती. त्या वेळी तिचा पुतण्या झोएर (६) याने तिच्यासोबत येण्याचा हट्ट केला. यामुळे मारिया त्यालाही घेऊन निघाली होती, मात्र त्याची शिकवणी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला रिक्षातून खाली उतरविले. यामुळे तो सुदैवाने या हत्याकांडातून बचावल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.