राज्यातील १५ हून अधिक ग्रंथसंग्रहालयांशी जोडण्याचा प्रयत्न
दीड लाखाहून अधिक ग्रंथसंपदा.. दहा हजारांहून अधिक संदर्भग्रंथ आणि सुमारे दीड हजार दुर्मीळ ग्रंथसंपदा असलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने आता ‘ई-बुक’ सेवेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या ग्रंथसंपदेची ‘ई-बुक’ रूपांतर करण्यात येणार असून साहित्य प्रेमींना सीडी आणि ऑनलाइन पद्धतीने ही पुस्तके प्राप्त होऊ शकणार आहेत. याशिवाय राज्यातील विविध पंधरा ग्रंथसंग्रहालयांशी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय ऑनलाइन पद्धतीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा ग्रंथसंग्रहालयांचे एक ऑनलाइन चळवळच निर्माण होऊ शकणार आहे, अशी माहिती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त मा. य. गोखले यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली.
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वाचकांना संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ई बुक’ योजनेद्वारे तरुणमंडळींना ग्रंथालयाशी आणि मराठी पुस्तकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ग्रंथसंग्रहालयातील सर्व पुस्तकांचे ‘डिजिटायझेशन’ करण्यात येणार आहे. ग्रंथसंग्रहालयात सुमारे दीड लाख पुस्तके असून दहा हजारांचा संदर्भ विभाग आहे. याशिवाय १८६७ च्या पूर्वीच्या सुमारे दीड हजार पुस्तकांचा संग्रह ग्रंथालयात आहे. त्यांचे ‘ई बुक’मध्ये रूपांतर केल्यानंतर ती वाचकांना ऑनलाइन वाचता येऊ शकतील, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त मा. य. गोखले यांनी दिली.

दुर्मीळ दस्तऐवजांच्या संवर्धनाचे आदेश
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मीळ साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचे ईबुकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय ग्रंथालयाने घेतला असून त्यासाठी लागणारी तांत्रिक मदत देण्याचे आश्वासन ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने व जिल्हा ग्रंथालय अधिकारी ठाणे यांच्या वतीने आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील तलावपाळीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे दुर्मीळ दस्तावेज मोठय़ा प्रमाणावर असून जिल्ह्य़ातील नावीन्यपूर्ण उपक्रमांतून हा दस्तावेज संरक्षित करण्यासाठी मदत करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.