04 July 2020

News Flash

ठाण्याचा महापौर कोण?

ठाणे महापालिकेच्या विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला होता

(संग्रहित छायाचित्र)

२१ नोव्हेंबरला निवडणूक; आज अर्ज दाखल

ठाणे महापौर आणि उपमहापौरपदासाठी गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी शनिवार दुपापर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा महापौर होणार हे स्पष्ट असले तरी या पदासाठी पक्षात चुरस असल्याने या पदावर कुणाची वर्णी लागते याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

ठाणे महापालिकेच्या विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे त्यांना आणखी काही महिन्यांची वाढीव मुदत मिळाली होती.

निवडणुका झाल्यानंतर म्हणजेच काही दिवसांपूर्वी राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ठाणे महापालिकेचे महापौर पद हे खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आले.

या आरक्षण सोडतीनंतर महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक केव्हा होणार, याविषयी उत्सुकता होती. असे असतानाच महापालिका सचिव विभागाने महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

म्हस्के, भोईर यांची नावे आघाडीवर

राज्यात शिवसेना-भाजप महायुतीमध्ये फूट पडली असली तरी त्याचा काहीच परिणाम ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीवर होणार नसल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा महापौर होणार आहे. या पदासाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के तसेच बाळकूम विभागातील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांची नावे आघाडीवर आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांची महाशिवआघाडी उदयास येत असल्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेत वाटा?

राज्यात भाजपसोबत फारकत घेऊन शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली असून यामुळे राज्यात या तिन्ही पक्षांची महाशिवआघाडी उदयास येत आहे. त्यामुळे या आघाडीतील मित्रपक्षांना ठाणे महापालिकेच्या सत्तेत शिवसेना सामावून घेणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सध्या पालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन या पक्षाला  उपमहापौरपद दिले जाऊ शकते, अशीही चर्चा पालिका वर्तुळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 12:20 am

Web Title: thane mayor election on 21 november abn 97
Next Stories
1 गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन; ‘ही’ ठरली शेवटची फेसबुक पोस्ट
2 ठाण्यात उद्योगांना दिलासा
3 ठाण्याच्या प्रवेशद्वारांवरील तिन्ही कमानी पाडणार
Just Now!
X