24 November 2017

News Flash

‘ठाणे महापौर मॅरेथॉन’चा उद्या सोहळा; २१ हजार १०० नागरिक धावणार 

७५ खाजगी शाळा, १२३ मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश 

ठाणे | Updated: August 12, 2017 6:35 PM

ठाणे महापालिकेकडून दर वर्षी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

यंदाची २८वी ‘ठाणे महापौर मॅरेथोन’ उद्या होणार आहे. यामध्ये २१ हजार १०० नागरिक धावणार असून अनेक सामाजिक संस्थासह जेष्ठ नागरिक, महिला, ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७५ खाजगी शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, ठाणे पालिकेच्या १२३ शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यात सहभाग घेणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी सकाळी ६.३० वाजत शुभारंभ करीत स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विजेत्या स्पर्धकांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ठाणे पालिकेच्या २८व्या महापौर मॅरेथॉनमध्ये यंदा २१ हजार १०० धावपटू विविध निश्चित किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत. तर यावेळी ‘रण फॉर फन’ अंतर्गत पहिल्यांदाच ठाणे पालिकेच्या महिला कब्बडी संघाच्या ३५ महिला खेळाडू, कँसरग्रस्त संस्थेची महिला टीम आणि नगरसेविका, सरस्वती शाळेचे माजी विद्यार्थी, उपवन आर्ट फेस्टिवल्स ग्रुप, न्यू होरीझोन कॉलेजचा ग्रुप यांच्यासह जेष्ठ नागरिक आणि खाजगी ७५ शाळांचे आणि ठाणे मनपाच्या १२३ शाळांचे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या स्पर्धेत धावणार आहेत. २१ किमीच्या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू पिंटू यादव, रामनाथ मेंगाळ आणि अनिल कपूर तर १० किमी अंतराच्या स्पर्धेत वीरेंद्र काळे, ऋषिकेश दुधावंत हे पुण्याचे खेळाडू आणि नुकत्याच ठाण्यात पार पडलेल्या क्रांती दौड स्पेधेतील विजेते ज्ञानेश्वर मोर्गा (पालघर) आणि १५ किमीच्या अंतराच्या स्पर्धेत महिलांमध्ये पुण्याच्या ज्योती चव्हाण, विनया मालुसरे, प्रियांका सावरकर यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे.

रविवारी होणाऱ्या ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (२), पोलीस निरीक्षक (७), सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक (२६) ,पोलीस शिपाई (१७७) आणि ६७ महिला पोलीस शिपाई यांचा समावेश असणार आहे.

First Published on August 12, 2017 6:35 pm

Web Title: thane mayor marathon celebrates tomorrow 21 thousand 100 citizens will run