ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धा यंदा १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या खुल्या गटात यापूर्वी पुरुषांना २१ किमी तर महिलांना १५ किमी अंतर पार करावे लागत होते. यंदा दोघांसाठी २१ किमीचे समान अंतर आणि समान बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पुरुषांप्रमाणे महिलांनाही जादा अंतर आणि समान रकमेची बक्षिसे असावी, अशी मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी मान्सूनच्या काळात शहरामध्ये ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या २९ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत १५ ते २० हजार धावपटू सहभागी होतात. यंदाच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये येत्या १८ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या स्पर्धेच्या नियोजनाबाबतही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून या बैठकीनंतर महापालिकेच्या क्रीडा विभागाने स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे.

या स्पर्धेमध्ये पुरुषांसाठी २१ किमी तर महिलांसाठी १५ किमी अंतर ठेवले जायचे. मात्र, यंदा दोघांसाठी समान अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे महिलांना आता १५ ऐवजी २१ किमीचे अंतर पार करावे लागणार आहे. या गटात पुरुषांना ७५ हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत तर महिलांना ५० हजार हजारांपासून ते  दहा हजारांपर्यंत बक्षिसे दिली जात होती. मात्र, अंतरासोबत बक्षिसांची रकमही समान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय, स्पर्धेत १८ वर्षांवरील मुलांप्रमाणे या वयोगटातील मुलींसाठीही स्पर्धा घेतली जाणार आहे.

प्रायोजकांची मदत..

ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत एकूण ८ लाख २४ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या रकमेसह स्पर्धेच्या आयोजनासाठी एकूण ७० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ४० लाखांचा खर्च महापालिका करणार असून उर्वरित ३० लाखांच्या खर्चासाठी प्रायोजकांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या स्पर्धेत टायमिंग चीपचा वापर केला जाणार आहे. तसेच गेल्या वर्षी स्पर्धेच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीचा संदेश देण्यात आला होता. यंदा स्पर्धेची संकल्पना अद्याप निश्चित झालेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.