पालिकेत सेना नगरसेवकांत खडाजंगी; स्वपक्षालाच अडचणीत आणत असल्याचा आरोप

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेच्या आमदारांनी स्वपक्षातील मंत्र्यांवर तोंडसुख घेण्याचा प्रकार ताजा असतानाच मंगळवारी ठाणे महापालिकेतही शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या पाश्र्वभूमीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बोलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.

सभागृहात विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नगरसेवकच आम्हाला अधिक गोत्यात आणतात, अशी भूमिका मांडत महापौर शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा या वेळी दिला. या वेळी आक्रमक झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी तर ‘आयुक्तांचे वादग्रस्त प्रस्ताव नेत्यांच्या आदेशामुळे आम्हाला मंजूर करावे लागतात आणि टीकेचे धनी व्हावे लागते,’ अशी हतबलता व्यक्त करीत स्वपक्षातील नगरसेवकांवर तोंडसुख घेतले. या वादात पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभारात अनियमितता असल्याचा मुद्दा उपस्थित करीत थेट महापौरांवर पलटवार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या समेटानंतर सर्वसाधारण सभेपुढे वादग्रस्त प्रस्तावांची जंत्री मांडली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर अशोक वैती यांनी ‘आनंद दिघे ज्या दिवशी माझ्या स्वप्नात येऊन आदेश देतील त्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांना वादग्रस्त ठेक्यांवरून न्यायालयात खेचेन’ असा इशारा देऊन सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला होता. या पाश्र्वभूमीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी महापौर दालनात बोलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने पक्षातील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत.

आयुक्तांवरही टीकास्त्र

गटनेत्यांच्या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपस्थित राहतील, असे नगरसेवकांना कळविण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री या बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या महापौरांनी बैठक सुरू होताच ज्येष्ठ नगरसेवकांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. सभागृहात विरोधकांपेक्षा आपल्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला कोंडीत गाठतात. मी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करते. त्यामुळे काही प्रश्न असतील तर पक्ष बैठकीत उपस्थित करावेत. सभागृहात अशी कोंडी करणार असाल तर मी उद्या पदाचा राजीनामा देईल,’ असा इशारा महापौरांनी दिला. या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही आम्ही पदे मागायला गेलो नव्हतो हे लक्षात ठेवा, अशा शब्दात काही नगरसेवकांना धारेवर धरले. काही पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही शिंदेसाहेब सांगतात त्यानुसार काम करतो. आयुक्तांचे काही वादग्रस्त प्रस्ताव वेळप्रसंगी आदेशामुळे आम्हाला मंजूर करावे लागतात. याविषयी तुमची खदखद असेल तर शिंदेसाहेबांकडे मांडा,’ अशा शब्दात ज्येष्ठांना फैलावर घेतले. अशोक वैती यांनी पालिकेतील कारभार आपल्याला अडचणीत आणेल हे लक्षात ठेवा, असा इशारा दिल्याचे समजते. यासंबंधी नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सेना नगरसेवकांमध्ये अस्वस्थता : शहरातील मैदाने बिल्डरांना भाडेपट्टय़ावर देणे, कळवा चौपाटी तसेच पाणी वितरण व्यवस्थेची वादग्रस्त कंत्राटे तसेच खाडीच्या पाण्याचे विक्षारणाच्या प्रस्तावावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत गाठले आहे. महापालिका प्रशासनाने वादग्रस्त प्रस्ताव सभागृहात मांडायचे आणि सत्ताधाऱ्यांनी निमूटपणे ते मंजूर करायचे, असा शिंरस्ता महापालिकेत सुरू झाला असून यामुळे शिवसेना नगरसेवकांच्या एका गटात कमालीची अस्वस्थता आहे.