देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संकट काही टळलेलं नाही. त्यासाठी करोनावरील लस सर्वात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना करोनाची लस घेण्याचा आग्रह करण्यात येत आहे. देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसींना मंजुरी देण्यात आली आहे. या तिन्ही लस प्रभावी असून करोनापासून संरक्षण मिळणार आहे. मात्र अद्यापही काही नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. अनेक जण लस कुठे मिळते याबाबतचे प्रश्न विचारत आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. असाच एक प्रश्न ठाण्यातील एका नागरिकांने फेसबुकवर विचारला. ‘ठाण्यात Vaccine कुठे देतात?’ असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यावर एका नेटकऱ्याने दिलेलं उत्तर पाहून ठाण्याच्या महापौरांना हसू आवरणं कठीण झालं. ‘डाव्या हातावर’ असं उत्तर एका नेटकऱ्याने दिलं आहे. हा प्रश्न आणि त्याचं उत्तर सोशल मीडियावरून थेट ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे पोहोचलं. हा प्रश्न आणि त्यावरील उत्तर वाचल्यानंतर त्यांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी हा प्रश्न आणि उत्तर शेअर करत मिश्किल पोस्ट लिहिली आहे.

“काय एकेक लोक असतात.. ते काहीही असो, पण अशा लोकांमुळे वैशाखात पाऊस पडतो खरा…आता या सद्गृहस्थाने दिलेल्या उत्तराने तुमच्याही चेहऱ्यावर हलकं हसू आलंच ना..आयुष्य कितीही खडतर असो, हसत हसत पार करता आलं पाहिजे..”, अशी पोस्ट ठाण्याच्या महापौरांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९३ टक्के इतकं झालं आहे. आज ८ हजार ७५२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. ठाण्यातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  सध्या ठाण्यात १६ हजार २६० सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत १०,२५७ जणांचा मृत्यू झाला आहे.