News Flash

महापौरांच्या लशीचे दुखणे वाढणार?

ठाणे महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नियम डावलल्याचा आरोप करत भाजपची केंद्राकडे तक्रार

ठाणे : ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी नियम डावलून करोना लस घेतल्याचा आरोप भाजपने केल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या अग्रक्रमात लोकप्रतिनिधींचा अजूनही समावेश करण्यात आलेला नाही. असे असताना महापौरांनी आमदारांसह लस घेतलीच शिवाय त्याचे छााचित्रही समाजमाध्यमांवर प्रसारित केले, असा आरोप करत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेषत: महापौर नरेश म्हस्के यांना लक्ष्य करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा महापौरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयामध्ये २० फेबु्रवारी रोजी महापौर नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांनी करोना लस घेतली होती. करोना आपत्तीच्या काळात घरी बसून ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौरांनी लस येताच स्वत:चा नंबर आधी लावला, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला.

महापौर म्हस्के आणि आमदार फाटक यांनी घेतलेली करोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही आणि होणारही नाही, अशी टीका डुंबरे यांनी केली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, हे सर्वांना समजण्याकरिता लस घेतल्याचा महापौरांचा दावा आहे. प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींना लस घेण्यासंबंधी प्राधान्यक्रमात समावेश नाही. महापौरांचे ठाण्यातील नेत्यांनीही अजून लस घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केलेले नाही. असे असताना महापौरांनी लस घेताना प्राधान्यक्रमाचा विचार केला की नाही, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

महापौरांचा पलटवार

महापौर नरेश म्हस्के यांनीही भाजपवर पलटवार केला आहे. करोनाकाळात लोकप्रतिनिधी काम करीत होते आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला. ते फ्रंटलाइन वर्कर्स नाहीत का? आम्ही कोविड अ‍ॅपवर नोंदणी करून नियमानुसारच लस घेतली आहे. याबाबत आरोप करणारे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनीही लसीकरणाची नोंदणी केली असून त्यासाठी त्यांनी माझ्याकडे त्यांची कागदपत्रे दिली होती. तसेच प्रसिद्धीसाठी भाजप चुकीच्या पद्धतीने राजकारण करीत असून त्यांच्यासारख्या आम्ही अन्नछत्राच्या नावाखाली कोट्यवधींच्या जागा लाटलेल्या नाहीत, असा आरोप महापौरांनी केला आहे.

आरोग्य मंत्र्यांकडे चौकशीची मागणी

महापौर नरेश म्हस्के, शिवसेना आमदार रवींद्र फाटक आणि आमदाराच्या पुत्राने फ्रंटलाईन वर्कर्स व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीवर डल्ला मारल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. तसेच महापौरांनी सत्तेचा गैरवापर करून आणखी कोणावर लसीची खैरात केली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:12 am

Web Title: thane mayor naresh mhaske shiv sena mla ravindra phatak akp 94
Next Stories
1 घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हातावर आता शिक्के
2 सांस्कृतिक कट्टे प्रत्यक्षात भरण्याची शक्यता धूसर
3 माजी नगरसेवकाची दोघांना मारहाण
Just Now!
X