लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम

 ठाणे : ठाणे महापालिकेने बुधवारी सकाळी आयोजित केलेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम सुरू करण्यासाठी तब्बल अडीच तास वाट पाहूनही महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च जयंती कार्यक्रम साजरा केला आणि त्यानंतर मुख्यालय परिसरात महापौर आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर महापौर शिंदे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकीचा प्रकार घडला.

ठाणे महापालिका मुख्यालयात नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी मातंग समाजाचे कार्यकर्ते सभागृहात सकाळी १०.३० वाजता पोहचले. परंतु अडीच तास उलटूनही महापौर शिंदे यांच्यासह एकही अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हते. या प्रकारामुळे मातंग समाजाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी स्वत:च प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महापौर आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

घोषणाबाजी सुरू असताना महापौरांची गाडी पालिका प्रवेशद्वाराजवळ आली. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा महापौरांच्या गाडीच्या दिशेने वळवला आणि त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना गाडीच्या समोरून बाजूला करण्यास सुरुवात केली असता, कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर महापौर शिंदे यांनी बल्लाळ सभागृहात जाऊन साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

महापौरांचे स्पष्टीकरण

जयंती कार्यक्रमाबाबत मंगळवारी रात्री उशिरा पालिका प्रशासनाने कळवले होते. मात्र, तब्येत ठीक नसल्यामुळे बुधवारी सकाळी रक्त तपासणीसाठी वेळ घेण्यात आली होती. त्याच वेळेत हा कार्यक्रम होता. उपमहापौरांनाही सकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दिवा येथून पालिकेत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे रक्त तपासणीनंतर लगेचच मुख्यालयात आल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.