News Flash

कचऱ्यापासून जळाऊ इंधन प्रकल्पाचे उद्घाटन

जागतिक वन दिनाचे औचित्य साधून महापालिकेने या उपक्रमाची सुरुवात केली.

महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प; १५० टन जळाऊ इंधनाची क्षमता
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने वतीने खासगी सहभागातून उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जळाऊ इंधननिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे सोमवारी महापौर संजय मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून महापालिकेने या उपक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असून त्याची सुमारे १५० टन जळाऊ इंधनाची निर्मिती क्षमता आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेते अ‍ॅड. अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब या वेळी उपस्थित होते.
ठाण्यातील कोपरी परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील पालापाचोळा, वृक्षाच्या तुटलेल्या फांद्या, शहाळे या हरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथील मलनि:सारण केंद्रात हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज १२ टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधनाच्या विटा (ब्रिकेट) तयार करण्यात येणार आहे. तयार झालेले हे विटा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर १ वर्षांनंतर प्रतिदिन १ टन जळाऊ इंधन पालिकेच्या शिवाजी रुग्णालयातील बॉयलरसाठी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे विविध सोसायटींच्या आवारात झाडांमुळे जो हरित कचरा निर्माण होतो त्याच्या व्यवस्थापनासाठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर वर्षभर धोकादायक म्हणून जी झाडे कापली जातात अथवा पावसाळ्यात झाडांची छाटणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या हरित कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन त्याचेदेखील जळाऊ इंधन तयार करण्यात येणार आहे. या वेळी उपायुक्त संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, समर्थ भारत व्यासपीठाचे मंगेश वाळंज, भटू सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. हळदेकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 2:48 am

Web Title: thane mayor sanjay more inaugurate waste recycling project
Next Stories
1 कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
2 बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत वाढ
3 पाणी वाहतुकीसाठी रिक्षा, दुचाकींचा वापर
Just Now!
X