चहापानाच्या निमित्ताने शिवसेनेची साखरपेरणी

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत वाद ओढावून घेत स्वतच्या पायावर दगड मारून घेणाऱ्या शिवसेना नेत्यांनी अखेर आयुक्तांसोबत दिलजमाईचे धोरण स्वीकारले असून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेचा वाद ताजा असताना महापौर संजय मोरे यांनी सोमवारी जयस्वाल यांच्या बंगल्यावर जात चहापान करत वाद मिटविण्यासंबंधी एक पाऊल पुढे टाकले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही मध्यंतरी हा वाद फारसा गंभीर नाही असे वक्तव्य करत हे प्रकरण फारसे ताणले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. यानंतर महापौरांनीही क्रीडा महोत्सवाचे निमित्त साधत जयस्वाल यांच्यासोबत संवाद साधत निवडणूकपूर्वीची कामे मार्गी लागतील यादृष्टीने काळजी घेतल्याची चर्चा आहे.

[jwplayer OnydZc5l]

ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या मान्यतेशिवाय विषयांची मांडणी करण्यात आल्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेनेने आयुक्त संजीव जयस्वाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून आयुक्त व शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. आयुक्तांनी महासभेच्या विषयपत्रिकेवरील सर्वच प्रस्ताव मागे घेऊन सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीयांना धक्का दिला होता. महापालिका निवडणुकांपूर्वी हे प्रस्ताव मंजूर झाल्यास निविदा प्रक्रियांची वाट सुकर होऊ शकणार आहे. असे असताना आयुक्तांनी प्रस्ताव मागे घेतल्याने साऱ्यांचेच धाबे दणाणले.

निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांशी संघर्ष झेपणारा नाही, ही बाब ओळखून शिवसेनेने आता जयस्वाल यांच्यासोबत मनोमीलनाचे प्रयत्न चालवले आहेत. मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यालयात भेट देत जयस्वाल यांच्यासोबत तब्बल तीन तास बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील विविध विकासकामे तसेच नागरी प्रश्नांचा निपटारा व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर सौम्य भूमिका घेताच महापौर संजय मोरे यांनीही सोमवारी सकाळी आयुक्त जयस्वाल यांना दूरध्वनी करत क्रीडा महोत्सवासंबंधी चर्चा करण्याची वेळ मागितली. महापौरांच्या दूरध्वनीनंतर जयस्वाल यांनी लागलीच त्यांना महापौर बंगल्यावर बोलावून घेत चहा पाजला. यावेळी या दोघांमध्ये क्रीडा महोत्सवाशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. तसेच तहकूब सभेचे रूपांतर कायम सभेत करून विषय कसे मार्गी लावता येतील, याविषयी या दोघांमध्ये खल झाल्याचे बोलले जाते. चहापानानंतर हे दोघे आयुक्तांच्या वाहनातून मुख्यालयात आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आयुक्तांसोबत माझे कोणतेही व्यक्तिगत मतभेद नाहीत. सोमवारी क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासंबंधी चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या बंगल्यावर गेलो. मुळातच मतभेद नव्हते तर दिलजमाईचा प्रश्नच येत नाही. हा सगळा प्रकार प्रसारमाध्यमांच्या मनातला खेळ आहे.

– संजय मोरे, महापौर

[jwplayer 8cIf7m5X]