महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांची गच्छंती

ठाणे : ठाणे शहरातील करोना नियंत्रणात अपयश आल्याचा ठपका ठेवत आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीचे प्रकरण ताजे असतानाच आता महापालिकेत महिनाभरापूर्वी रुजू झालेले मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांना बदलण्याची नामुष्की नवे आयुक्त विपीन शर्मा यांच्यावर ओढावली आहे. करोना नियंत्रणासाठी शिंदे यांना खास ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. मात्र, डॉ. शिंदे यांचे काम योग्य होत नसल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी त्यांना माघारी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने नव्यानेच उभारलेल्या बाळकूम येथील कोविड रुग्णालयातील मृतदेहाच्या अदलाबदलीच्या प्रकारानंतर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

ठाणे शहरात करोना नियंत्रणातील सावळागोंधळ अगदी सुरुवातीपासून सुरू आहे. मार्च महिन्यात आयुक्तपदी रुजू झालेले विजय सिंघल यांना करोना नियंत्रणात अपयश आल्याची चर्चा सातत्याने सुरू असताना नुकतीच सरकारने त्यांची बदली केली. सिंघल यांच्या काळात आरोग्य विभागात समन्वयाचा गोंधळ होता. याशिवाय महापालिकेतील काही जुन्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने सुरुवातीपासूनच कामकाजात विस्कळीतपणा होता. आयुक्त आणि नव्या अतिरिक्त आयुक्तांकडून काढल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आदेशांमुळे हा गोंधळ अधिक वाढला. आरोग्य विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने महिनाभरापूर्वी शासन सेवेतील डॉ. चारुदत्त शिंदे यांची ठाणे महापालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांनाही कामाचा ठसा उमटविता आला नसल्याचे दिसत होते. ठाणे येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या उभारणी दरम्यान डॉ. शिंदे कमालीचे सक्रिय दिसत होते. मात्र, आरोग्य विभागातील घडी बसवण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांना महापालिका आयुक्तांनी पदावरून कार्यमुक्त केले.

बेपत्ता रुग्णाच्या प्रकरणाचे निमित्त

ठाणे येथील साकेत परिसरात महापालिकेने तात्पुरते कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा अंत्यविधी दुसऱ्या रुग्णाच्या नावाने उरकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणानंतर संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला होता. हे प्रकरण भाजपने उचलून धरत आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणामुळे सत्ताधारी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची आयती संधी भाजपने साधली. हे प्रकरण ताजे असताना डॉ. शिंदे यांना माघारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदाचा तात्पुरता कार्यभार डॉ. आर. के. मुरूडकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंबंधी डॉ. शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.