उकाडय़ामुळे नागरिक हैराण

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहराचा पारा ४० अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. त्यातच आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने प्रत्यक्ष उकाडा आणखी जाणवू लागला आहे. परिणामी ठाणेकरांनी दुपारी एक ते चारदरम्यान रस्त्यावर फिरणे टाळण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचे सांगितले आहे.

मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होऊ लागली असली तरी, मध्यंतरी कमाल तापमान घसरल्याने उष्मा फार जाणवत नव्हता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वर चढत आहे. बुधवारी सकाळी ठाण्याचा कमाल पारा ४० अंशांपर्यंत गेला होता, तर मंगळवारीही ३६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने ठाणेकरांना सकाळी आणि दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. याचा फटका प्राणी आणि पक्ष्यांनाही मोठय़ा प्रमाणावर बसत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये ठाणे आणि कल्याण परिसरात १५ पक्ष्यांना उष्माघात झाल्याचे पक्षिप्रेमींकडून सांगण्यात आले.

फळांचा आधार

वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणारे नागरिक रसदार फळे किंवा थंड पेयांचे सेवन करण्यावर भर देत आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, राम मारुती मार्ग, जांभळी नाका, गावदेवी मैदान येथे फळांचे रस, पन्हे आणि ताक याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. याचबरोबर कलिंगड, ताडगोळे, काकडी, जांभूळ या फळांना मागणी वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात दुपारी २ ते ४ या वेळेमध्ये उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने बाहेर पडणे टाळावे. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. तसेच बाहेर जाताना छत्री अथवा मफलरचा वापर करावा.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रक अधिकारी, ठाणे महानगरपालिका

उन्हाळ्याचा फटका मोठय़ा प्रमाणावर पक्ष्यांनाही बसला आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यासाठी नागरिकांनी खिडकी, गच्ची अथवा बाल्कनी येथे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

– महेश बनकर, पक्षिप्रेमी अभ्यासक