News Flash

दळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय

घोडबंदर आणि या भागात वाढलेल्या नव्या ठाण्याच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार

मुंबईवरील वाहतूक भार कमी करायचा असेल तर वाहतूक प्रकल्पांच्या नियोजनाचा विचार केवळ मुंबईपुरता करून भागणार नाही, याचे भान उशिरा का होईना राज्य सरकारला येऊ लागले आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील विकास प्रकल्प तसेच पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरण स्थापन करूनही आता बराचसा कालावधी लोटला आहे. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मुंबईत कोटय़वधी रुपयांचे स्कायवॉक बनविण्यात मग्न राहिलेल्या महानगर विकास प्राधिकरणाने मुंबई पलीकडच्या शहरांच्या विकासाकडे पाठच फिरवली. नवी मुंबईत सिडकोसारखे सक्षम प्राधिकरण असल्याने तेथील पायाभूत प्रकल्पांचे नियोजन करण्याचा भार अर्थातच एमएमआरडीवर नव्हता. मात्र, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांमधील आर्थिकदृष्टय़ा खंगलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मर्यादा लक्षात घेऊन येथील वाहतूक प्रकल्पांची आखणी आणि अंमलबजावणी यापूर्वीच सुरू होण्याची आवश्यकता होती. मात्र, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रस्त्यांची कामे सुरू करून एमएमआरडीएने ठाणे आणि आसपासच्या शहरांच्या तोंडाला एकप्रकारे पानेच पुसली. राज्यातील सत्ताबदलानंतर मात्र हे चित्र झपाटय़ाने बदलू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कल लक्षात घेता एमएमआरडीएतील नियोजनकारांनाही सध्या महानगर प्रदेशाविषयी ममत्व वाटू लागले आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात सापडलेली मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाची गाडी रुळावर आली असून पायाभरणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागली आहे.
ठाणे शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. वर्षांनुवर्षे स्वतचे वेगळे अस्तित्व राखून असलेले हे शहर मुंबईला केव्हाच पर्याय ठरू लागले आहे. रेल्वे हा सार्वजनिक वाहतुकीचा मोठा पर्याय या दोन्ही शहरांना एकमेकांशी जोडत असतो. अर्थातच ठाणे पलीकडे असलेल्या जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा भार मर्यादेपेक्षा वाढू लागला आहे. ठाणे आणि डोंबिवलीसारखी स्थानके तर या भारामुळे मोडून पडतील की काय अशी परिस्थिती आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरांशी असलेल्या जवळिकीमुळे घोडबंदर मार्गावरील गगनचुंबी इमल्यांमधील तुलनेने स्वस्त असलेल्या घरांना गेल्या काही वर्षांत मोठी मागणी आहे. मूळ ठाण्याचे सांस्कृतिकपण मिरवत बसण्यापेक्षा मुंबईस लागून असलेले उपनगराचे श्रीमंतीपण जगण्यात येथील नवठाणेकरांना अधिक रस आहे. त्यामुळे मुंबईतील मोठय़ा विकासकांनी गेल्या काही वर्षांत घोडबंदरला ‘जी.बी. रोड’ अशी नवी ओळख मिळवून देण्यासाठी पद्धतशीरपणे विपणन व्यवस्था उभारली आहे आणि त्यामध्ये ही मंडळी बऱ्याच अंशी यशस्वीही ठरली आहे. या मार्गावरील उच्चभ्रू इमल्यांचा भार शहरातील पायाभूत सुविधांवर पडतोच आहे, शिवाय ठाणे रेल्वे स्थानकाच्या मर्यादाही उघड करतो आहे. येथे मोठय़ा बिल्डरांच्या विशेष नागरी संकुलांना मंजुरी देण्यात नेहमीच सरकार आणि महापालिकेतील उच्चपदस्थांना रस राहिला आहे. मात्र, लोकसंख्येचा हा अतिरिक्त भार वाहण्यासाठी आणि मुंबईला ठाण्याशी लवकरात लवकर जोडायला हवे याचे भान मात्र राज्यकर्त्यांना राहिले नाही हेच वर्षांनुवर्षे दिसून आले. महानगर क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले, तर मुंबईसारख्या महानगरसाठीही ते सोयीचे ठरू शकेल याचे भान नव्या मुख्यमंत्र्यांना लवकर आल्याचे सध्या तरी दिसत आहे. आणि त्यामुळे ठाणे मेट्रो आणि नव्या विस्तारित स्थानकासाठी वेगाने पावले उचलताना केवळ ठाण्याची नव्हे तर वेगळ्या मार्गाने मुंबईतील वाढत्या गर्दीचीही पद्धतशीरपणे ‘सोय’ लावली जात असल्याचे दिसते आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांची लोकसंख्या २२ लाखांपर्यंत पोहचली आहे. ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या या सर्व भागासाठी सद्य:स्थितीत चार रेल्वे स्थानके असली तरी एकटय़ा ठाणे स्थानकावर दररोज सुमारे सहा लाख प्रवाशांचा भार पडतो. ठाणे आणि आसपासच्या शहरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उभा राहावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांना मुंबई-ठाणे हा मेट्रो प्रवास अनुभवता येणार आहे. घोडबंदर आणि या भागात वाढलेल्या नव्या ठाण्याच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार असून त्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठीचा हेलपाटा, वेळ आणि त्यामुळे पर्यायाने होणारी वाहतूक कोंडीही दूर होऊ शकणार आहे.
काय आहे प्रकल्प?
वडाळा-कासारवडवली ठाणे मेट्रो रेल्वे हा मार्ग पूर्ण उन्नत ठरविण्यात आला आहे. वडाळा ते कापूरबावडीपर्यंत हा प्रकल्प सुरुवातीला भूमिगत ठरविण्यात आला होता. मात्र मुलुंड ते घाटकोपर या मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवर आतापासूनच असणारी कोंडी लक्षात घेता हा प्रकल्प भूमिगत केला गेल्यास फारच महागडा ठरेल असा निष्कर्ष यासंबंधी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीने काढला. त्यामुळे भूमिगत आखणीमुळे यापूर्वी १९ हजार ९७ कोटीपर्यंत पोहचलेला हा प्रकल्प पूर्णत उन्नत करून सुमारे ११ हजार कोटीपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाण्यात मिळून एकूण ३०.८ किमीच्या मेट्रो मार्गावर ३२ स्थानके आहेत. त्यातील २० स्थानके मुंबई हद्दीत, तर उर्वरित १२ ठाण्याच्या हद्दीत असतील. वडाळा, आणिक, प्रियदर्शनी भागात पूर्व द्रुतगती मार्गाखालून कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर आणि पुढे एलबीएस रोड मार्गे ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे. ठाण्याच्या मेट्रोचा अर्धाअधिक भाग मुंबईमय होणार आहे. एका अर्थाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्थेला नवा पर्याय या माध्यमातून उभा राहणार आहे. त्यामुळे नावात ठाणे असले तरी ही मेट्रो मुंबईची असेल अशी ही व्यवस्था आहे.

मेट्रोची स्थानके
भक्ती पार्क मेट्रो, अणिकनगर, प्रियदर्शनी, कुर्ला नेहरूनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, विद्यविहार मेट्रो, घाटकोपर मेट्रो, आर-सीटी मेट्रो, गोदरेज कॉलनी, विक्रोळी मेट्रो, गांधीनगर, कांजुरमार्ग मेट्रो, भांडुप मेट्रो, सोनापूर, मुलुंड नाका, ठाणे तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकूजीनी वाडी, पाटलीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली अशी स्थानके या प्रकल्पात निश्चित करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 12:34 am

Web Title: thane metro benefits for mumbai
Next Stories
1 निमित्त : ब्रिटिशकालीन पूल- शोध आणि बोध
2 शहरबात कल्याण : गर्दी आणि कोंडीचे जंक्शन
3 वसईत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार
Just Now!
X