वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्दसह शहरात तब्बल ११८ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तब्बल ३५ हजार ४०० कोटी रुपये खर्चून मेट्रोचे हे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व या १६.५ किमी लांबीच्या आणि दहिसर ते डीएन नगर या १८.६ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग प्रकल्पांच्या विस्तृत प्रकल्प अहवालासही (डीपीआर) या बैठकीत मान्यता देण्यात आली. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी तयार केलेले हे दोन्ही प्रकल्प अहवाल आता मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी जागतिक बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था (जायका) आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अर्थसाहाय्य उभारण्यासही प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
mum01आणखी तीन उन्नत मार्ग
वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रूझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणखी तीन उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी ७४३.७३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महानगर टेलिफोन निगम जंक्शनपासून थेट लालबहादूर शास्त्री उड्डाणपुलार्पयचा १.३ किमी लांबीचा उन्नत मार्ग आणि कुर्ला येथील कपाडिया नगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ वाकोलापर्यंत असे उन्नत मार्ग बांधण्यात येणार असून त्यामुळे  सांताक्रूझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘जी ब्लॉक’मधील भारत डायमंड बोर्सपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोलापर्यंत उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.