09 December 2019

News Flash

मेट्रो स्थानकांत सुविधांचे जाळे

सर्व स्थानकांच्या परिसरात महानगर प्राधिकरणाने बहुवाहतूक परिवहन प्रकल्पांची आखणी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आवारात वाहनतळ, बसथांब्यांसह सायकल मार्गिका; नवी मुंबईच्या धर्तीवर परिसर विकासाचा आराखडा

मुंबई तसेच आसपासच्या शहरांत विस्तारत चाललेले मेट्रोचे जाळे आणि भविष्यात या वाहतूक सेवेकडे येणारा प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो स्थानकांच्या परिसरांत अन्य प्रवासी सुविधांचीही उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसराच्या धर्तीवर मेट्रो स्थानकांच्या आवारात वाहनतळ, बसस्थानके, पादचारी मार्ग तसेच सायकल मार्गिकांची उभारणी करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ३०० किलोमीटर अंतराचे जाळे विणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १८० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर असून ५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आखणीचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच ९० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो मार्गिकांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही सुरू आहे. सद्य:स्थितीत मुंबईतील वेगवेगळ्या मार्गावर तसेच ठाण्याच्या दिशेने मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू  असून भिवंडी-कल्याण, कल्याण-तळोजा अशा काही मार्गिकांचे अहवाल तयार केले जात आहेत. मुंबईतील घाटकोपर ते अंधेरी मार्गावर सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असला, तरी या प्रकल्पातील रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पातील बहुतांश स्थानकांच्या परिसरात वाहनतळाची कमतरता तसेच रिक्षा, बस थांब्याचे योग्य असे नियोजन नाही. हा अनुभव लक्षात घेता यापुढील सर्व स्थानकांच्या परिसरात महानगर प्राधिकरणाने बहुवाहतूक परिवहन प्रकल्पांची आखणी केली आहे.

मुंबई तसेच ठाणे मेट्रो प्रकल्पातील प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या आसपासच्या परिसराचा एकत्रित विकास करून तेथे प्रवाशांना सोयीच्या ठरतील अशा सुविधांचा विकास करण्याचा अराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थानकाच्या लगत असलेल्या परिसरात पादचारी मार्गाचे रुंदीकरण, सायकल मार्गाचा विकास, वाहतूक-चौकांची सुधारणा, रहदारी सिग्नलची नव्याने आखणी केली जाणार आहे. आवश्यक ठिकाणी सायकल मार्गिकांची बांधणी तसेच वाहन तळांची उभारणी केली जाणार असून या भागातील रस्त्यांच्या कडेला होणारी अवैध पार्किग बंद करण्याची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. याशिवाय पादचारी पूल, आकाश मार्गिका, सार्वजनिक सायकल थांब्यांची उभारणी करण्याचे ठरविण्यात आले असून, या सर्व स्थानकांच्या परिसराचा विकास नवी मुंबईतील स्थानकांच्या धर्तीवर केला जाईल, अशी माहिती महानगर प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. काही स्थानकांच्या दिशेने येजा करणाऱ्या खासगी वाहनांची उचल आणि सोड करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. प्राधिकरणाने आखलेल्या या आराखडय़ास नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचे नियोजन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

First Published on August 15, 2019 12:54 am

Web Title: thane metro station facilities abn 97
Just Now!
X