कासारवडवली ते गायमुखदरम्यानचे सर्व उड्डाणपुलांचे नियोजन रद्द; एमएमआरडीएच्या निर्णयामुळे वाहनांच्या रहदारीला फटका बसण्याची भीती

मुंबई-ठाणेदरम्यान प्रवासी वाहतुकीचा जलद पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी वडाळा ते कासारवडवली अशी मेट्रो सुरू करण्यात येत असली तरी, याचा फटका घोडबंदर मार्गावरील वाहनांच्या रहदारीला बसण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने(एमएमआरडीए) आखलेले सर्व उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मेट्रोचा विस्तार मुख्य रस्त्यावरून करण्यात येत असल्याने पुलांचे नियोजन रद्द करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. मात्र यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी भविष्यात आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई ते ठाणे दरम्यान वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो मार्गाची आखणी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभही उरकण्यात आला. या मेट्रोचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी वेगवेगळ्या माध्यमांतून करण्यात येत होती. त्यानुसार कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीस ४ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पास आणि त्यासाठी लागणाऱ्या ९४५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र आता ही मेट्रो घोडबंदर मार्गावरील वाहनांसाठी अडचणीची ठरणार आहे.

वडाळा ते ठाण्यापर्यंतचा हा मेट्रो मार्ग रस्त्याच्या मधोमध असताना ठाण्यात येऊन तो बऱ्याच ठिकाणी सेवा रस्त्यांना खेटून उभारण्यात येणार असल्याचा मुद्दा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून उपस्थित करण्यात आला होता. सेवा रस्त्यांना लागून होत असलेल्या उभारणीमुळे मेट्रोची स्थानके एका कोपऱ्यात जातात तसेच मार्गिकेचा खर्चही वाढण्याची शक्यता असते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पूर्वद्रुतगती महामार्गावर ठाणे शहरात जागोजागी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली असून यामुळे रस्त्यांच्या मधोमध मेट्रो मार्ग उभारणे शक्य नसल्याचा मुद्दा यापूर्वीच एमएमआरडीएने स्पष्ट केला आहे. घोडबंदर मार्गावर कापुरबावडी, मानपाडा येथे उड्डाणपूल असून या मार्गावरील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन कासारवडवली, गायमुख भागांतही उड्डाणपुलांची आखणी करण्यात आली होती. मात्र मेट्रोचा विस्तार होताच पुढील मार्गावरील सर्व उड्डाणपूल रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. घोडबंदर मार्गावर जेथे जेथे उड्डाणपूल आहेत तेथे मेट्रोची मार्गिका सेवा रस्त्यांवर घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र कासारवडवली ते गायमुख हा मार्ग वर्दळीचा असूनही त्या ठिकाणी एकही उड्डाणपूल अद्याप उभारला गेलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी मध्यभागातून मेट्रोचा मार्ग काढला जाईल आणि त्यासाठी नियोजित उड्डाणपूल रद्द करण्यात आले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.