कोपरी पुलाच्या कामालाही मुहूर्त गवसला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होऊनदेखील गेले वर्षभरापासून निविदा प्रक्रियेत अडकलेले वडाळा ते ठाणेदरम्यानच्या मेट्रोच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या कामासाठी ठेकेदार निश्चित करण्यात आला असून मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. मेट्रोसोबत कोपरी उड्डाणपुलाचे कामही एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होत असून ठाणे शहरातील तीन उड्डाणपुलांची कामेही जून अखेपर्यंत पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला.

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर क्षेत्रातील मोठय़ा प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी वडाळा ते ठाणे या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळाही आयोजित करण्यात आला होता. खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते हा सोहळा पार पडल्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामास वेगाने सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होती. ठेकेदार मिळत नसल्याने हे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता ठेकेदाराची नियुक्ती झाली असून मे महिन्याच्या अखेरीस मेट्रोच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या दिशेने येजा करण्यासाठी आखण्यात आलेल्या कोपरी उड्डाणपुलाचे कामही एप्रिल महिन्यात सुरू होत आहे, असे जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. या प्रकल्पाच्या आखणीविषयी गेल्या दहा वर्षांपासून चर्चा सुरू असून कामाचा खर्चही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. पुढील महिन्यात हे काम सुरू होत असल्याने ठाणेकरांना भविष्यात मोठा दिलासा मिळू शकेल, असा दावा जयस्वाल यांनी केला.