16 February 2019

News Flash

ठाणे स्थानक गर्दीचे!

 डोंबिवली रेल्वे स्थानकावर असलेला ‘सर्वाधिक प्रवाशां’चा भार आता ठाण्यावर आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल १२ हजारांनी वाढली आहे.

मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्येत आघाडीवर; सीएसएमटी, दादर, विक्रोळी, भायखळा स्थानकांतील गर्दी ओसरली

मुंबई : डोंबिवली रेल्वे स्थानकावर असलेला ‘सर्वाधिक प्रवाशां’चा भार आता ठाण्यावर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल १२ हजारांनी वाढली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा भार सतत वाढतोच आहे. या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेकडून २०१७-१८ मधील प्रवासी संख्येचा आढावा घेण्यात आला. यात ठाणे स्थानक हे प्रवासी संख्येत प्रथम क्रमांकावर राहिले आहे. ठाणे स्थानकातून दररोज २  लाख ५८ हजार ३६३ प्रवासी प्रवास करत आहेत. २०१६-१७च्या तुलनेत दररोज १२ हजार ६६८ नवीन प्रवाशांची भर ठाणे स्थानकात पडली आहे. याआधी डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेले स्थानक ठरले होते. मात्र या स्थानकालाही ठाण्याने मागे टाकले आहे, तसेच बदलापूर स्थानकातील गर्दीही वाढल्याचे समोर आले आहे. तुलनेत गर्दीचे स्थानक अशी ओळख असलेल्या आणि जागतिक दर्जा असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भांडुप, विक्रोळी स्थानकांतील प्रवासी संख्या कमी झालेली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर स्थानकात होणारी गर्दी हा चर्चेचा मुद्दा राहिला. रेल्वेची प्रवासी संख्या वाढत गेली. त्यामानाने सोयीसुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. गेल्या काही वर्षांत उपनगरात उभी राहणारी रहिवासी संकुले, सरकारी आणि खासगी कार्यालये यामुळे उपनगरावर भार वाढत गेला. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगैर यांबरोबरच कल्याण ते ठाणे येथून सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत गेली आणि लोकल गाडय़ांवर आपसूकच भार वाढला. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत गर्दीचा प्रवास अशी ओळख असतानाच हीच वेळ आता दुपारी एक वाजेपर्यंत वाढत गेली.

मध्य रेल्वेने २०१७-१८ मधील प्रवासी संख्येचा आढावा घेतला असता ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत गेल्याचे समोर आले आहे. दररोज २ लाख ५८ हजार ३६३ प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात आणि २०१६-१७ मध्ये हीच संख्या २ लाख ४५ हजार ६९५ एवढी होती. या स्थानकातून दररोज २२ लाख ५२ हजारांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. ठाणे स्थानकाने डोंबिवली स्थानकालाही मागे टाकले आहे. येथून २०१६-१७ मध्ये दररोज २ लाख ४७ हजार २१८ प्रवासी प्रवास करत होते. २०१७-१८ मध्ये त्यात दोन हजार ७१ प्रवाशांची भर पडली आहे. या दोन स्थानकांपाठोपाठ सर्वाधिक प्रवाशी संख्या घाटकोपर (तिसरे), दिवा (चौथे) आणि पनवेल (पाचवे) स्थानकांवर आहे. दिवा स्थानकातून दररोज १ लाख २ हजार २२७ प्रवासी प्रवास करतात. त्याआधीच्या वर्षी हाच आकडा ९५ हजारांपर्यंत होता.

इथली गर्दी ओसरतेय

’ सीएसएमटी, दादर, भायखळा, विक्रोळी, भांडुप स्थानकांतील गर्दी ओसरतेय.

’ सीएसएमटी स्थानकातून २०१६-१७च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ९,७५७ प्रवासी कमी झाले आहेत.

’ २०१६-१७ मध्ये १ लाख ५४ हजार ३७९ प्रवासी दररोज प्रवास करत होते.

अन्य काही स्थानकांतील प्रवासी संख्येची माहिती

स्थानक                       प्रवासी संख्या

२०१६-१७                  २०१७-१८

कल्याण              २,०४,२०१                  २,०८,८०१

दादर                   ७४,१०१                    ७२,९०६

घाटकोपर           १,८५,५५७                  १,९०,४५८

पनवेल              ८२,१८७                      ८८,९६०

कुर्ला                १,५७,५६३                    १,५७,६४१

मुलुंड                 १,५२,७७९                   १,५२,८६६

बदलापूर              ९१,५५०                      ९७,९६७

अंबरनाथ             ८०,४५०                       ८१,८९४

उल्हासनगैर             ६१,५७२                       ६१,६३७

मुंब्रा                  ८२,८४९                       ८३,९१७

भांडुप                १,०७,६०८                    १,०५,१९२

विक्रोळी               ९५,०६४                      ९२,५६७

भायखळा            ७१,३८८                         ७०,०४२

First Published on April 24, 2018 2:42 am

Web Title: thane most crowded station on central railway