मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी;  मुलुंड, वाशी, ऐरोली टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शहरांच्या वेशीवर बंदोबस्त वाढवला आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच काळय़ा पैशाच्या ने-आणवर नजर ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मुलुंड, वाशी, ऐरोली, दहिसर अशा सर्वच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

येत्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, पालघर या शहरांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावणार आहेत. निवडणुकीदरम्यान, मतदारांमध्ये वाटप करण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी मोठय़ा प्रमाणात काळा पैसा शहरात आणला जाण्याची शक्यता आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई व ठाणे पोलिसांनी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून मुलुंड, ऐरोली, वाशी, दहिसर टोलनाक्यांवर नाकाबंदी सुरू केली. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हे सर्व टोलनाके सकाळ-संध्याकाळ वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे आधीच येथे वाहतूक कोंडी होत असताना पोलिसांच्या नाकाबंदीमुळे गुरुवारपासून यात भर पडली आहे. मुलुंड टोलनाक्यापासून तीन हात नाका उड्डाणपुलापर्यंत गुरुवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच दुपारी साडेबाराच्या सुमारास कोपरी येथील रेल्वेपुलावर एका ट्रकचे चाक फुटून तो अडकला. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर कोपरी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धक्का मारून हा ट्रक बाजूला केला.

 ठाण्याहून मुंबईच्या दिशेने

जाताना तीन हात नाका ते मुलुंड टोलनाका हे वाहनाने अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक ते दीड तासांचा कालावधी लागला. त्यामुळे मुंबईत खासगी वाहनाने कामावर निघालेल्या कामगारांना या वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात वेळेवर पोहोचता आले नाही, तर विमानतळावर वेळेवर पोहोचता यावे म्हणून निघालेल्या अनेकांची यामुळे धांदल उडाली.

तसेच दोन रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. टोलनाक्यावरील कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने या रुग्णवाहिकांना जागा करून देण्यात आली.

घोडबंदर मार्गावरही कोंडी

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक ट्रक सकाळी ८ च्या सुमारास रस्त्याकडेला पडला. या अपघातामुळे मानपाडय़ापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात ट्रकचालक सुरेश पांडे हे जखमी झाले. त्यांना वाहतूक पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कासारवडवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली, तर कासारवडवली येथेही सकाळी रस्तादुरुस्तीचे काम सुरू असल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ओवळा येथपर्यंत वाहतूक कोंडी होती.

मुंबई पोलिसांनी टोलनाक्यावर नाकाबंदी केली होती. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा परिणाम ठाण्यात जाणवला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.

– मनसब सातदिवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी वाहतूक शाखा