वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई
गुजरात राज्य तसेच मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून या मार्गावर बेकायदा उभी करण्यात येणारी वाहने या कोंडीत भर पाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहनतळाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका मुख्यालय स्तरावरून प्रत्येक प्रभाग समितीसाठी एजन्सी नियुक्त करण्याची तयारीही सुरू केली आहे.
मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग घोडबंदर भागातून जात असल्याने या मार्गावरून गुजरात तसेच मुंबईकडे वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांचाही आकडा मोठा आहे. त्याशिवाय, घोडबंदर भागाचे झपाटय़ाने नागरीकरण झाले असून या भागातील रहिवासीही याच मार्गावरून प्रवास करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होऊ लागल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. या मार्गावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या मार्गावर बेकायदेशीरपणे उभी करण्यात येणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर रस्त्याचे मार्किंग आणि वसुलीबाबत मुख्यालय स्तरावरून प्रत्येक प्रभाग समितीसाठी एजन्सी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले आहेत. शहरातील बेवारस वाहनांसाठी वाहतूक पोलीस शाखेला डायघर परिसरात जागा देण्यात आली असून त्या ठिकाणी महापालिकेने आवश्यक ती कामे करून दिल्यानंतर तिथे सर्व बेवारस वाहने ठेवण्याचे आवाहनही केले आहे.