स्थानक परिसरातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न

ठाण्यातील सिग्नल शाळेच्या धर्तीवर आता मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात प्लॅटफार्म शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. स्थानक परिसरात भटकंती करणारी, भिक्षा मागणारी तसेच बूटपॉलिश करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, पोषण आहार, पाठय़पुस्तके आणि शालेय साहित्य महापालिकेमार्फत दिले जाणार आहे.

ठाणे येथील तीन हात नाका उड्डाणपुलाखाली महापालिका प्रशासनाने सिग्नल शाळेची उभारणी केली असून या उपक्रमाच्या माध्यमातून सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या तसेच विविध साहित्यांची विक्री करणाऱ्या मुलांना शिक्षण दिले जाते. राज्य शासनाने सिग्नल शाळेच्या उपक्रमाची दखल घेत राज्यभरामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता मुंब्रा स्थानक परिसरात प्लॅटफार्म शाळा सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. मुंब्रा स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या एक हजार चौरस फुटांच्या जागेमध्ये ही शाळा उभारण्यात येणार आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर असलेल्या मुंब्य्रातील स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात भटकंती करणारी, भिक्षा मागणारी तसेच बूटपॉलिश करणारी मुले असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.

कष्टकरी, दुर्बल व वंचित घटकांतील ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्याची बाब लक्षात घेऊन महापालिकेने त्यांच्यासाठी प्लॅटफार्म शाळा सुरूकरण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शाळेमध्ये सुरुवातीला तीन ते आठ वयोगटातील १२ मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो येत्या २० जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली,