ठाणे महापालिकेचा निर्णय; यापुढे यांत्रिक पद्धतीने सफाई; नागरिकांना दिलासा
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांतील नाल्यांपाठोपाठ आता जलकुंभांचीही रोबोटिक यंत्राद्वारे साफसफाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील जलकुंभांची साफसफाई यापूर्वी ठेकेदार मानवी पद्धतीने करीत होते. त्यामुळे साफसफाईसाठी बराच वेळ वाया जात होता. तसेच मानवी पद्धतीने कराव्या लागणाऱ्या सफाईमुळे अनेकदा ठरावीक विभागांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असे. महापालिकेच्या या नव्या प्रस्तावामुळे रोबोटिक यंत्राद्वारे शहरातील जलकुंभांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणार असून त्यामध्ये महापालिकेचे पैसेही वाचणार आहेत. या सफाई दरम्यान जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची योग्य पद्धतीने साफसफाई होत नसल्याच्या मुद्दय़ावरून गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन टीकेचे धनी ठरत आहे. नालेसफाईची कामे दरवर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरत असतात. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबईच्या धर्तीवर शहरातील मोठय़ा नाल्यांची साफसफाई रोबोटिक मशीनद्वारे करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरही करण्यात आला. त्यापाठोपाठ आता शहरातील सर्वच जलकुंभांची रोबोटिक यंत्राद्वारे सफाई करण्याचा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार जलकुंभांची साफसफाई करण्यासाठी रोबोटिक यंत्र खरेदी केले जाणार असून त्यासाठी सुमारे तीन कोटी खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी जलकुंभांच्या साफसफाईवर एक कोटी रुपये खर्च केले जातात. आता रोबोटिक यंत्रामुळे महापालिकेचा दरवर्षीचा हा खर्च वाचणार आहे. जलकुभांच्या साफसफाईचे कंत्राट मिळविण्यासाठी कंत्राटदारांमध्ये मोठी स्पर्धा लागत असे. ही कामे आता रोबोटिक यंत्र करणार आहे.

तरीही पाणी सेवा सुरूच राहणार..
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांमध्ये एकूण ५३ जलकुंभ आहेत. याशिवाय, पाणीपुरवठय़ाचे नियोजन करणारी पंप हाऊस तसेच अन्य यंत्रणा ठिकठिकाणी आहे. जलकुंभांसोबतच या सर्व यंत्रणेची रोबोटिक यंत्राच्या साहाय्याने साफसफाई केली जाणार आहे. रोबोटिक यंत्राद्वारे साफसफाई करण्यासाठी जलकुंभातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याची गरज नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, ठराविक कालावधीत रोबोटिक यंत्र जलकुंभांची साफसफाई करणार असल्यामुळे पावसाळ्यापुर्वी शहरातील जलकुंभांची साफसफाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.