रुग्णालय प्रमुखांची बदली, तर चार परिचारिका निलंबित

ठाणे : ठाणे महापालिकेने नव्यानेच सुरू केलेल्या ग्लोबल हब येथील कोविड रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीचा जो प्रकार घडला त्याबद्दल मी संबंधीत कुटुंबाची माफी मागतो, अशा शब्दात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी झाल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रुपेश शर्मा यांची तातडीने बदली करण्यात आली असून चार परिचारिकांना कागदपत्रांतील घोळ झाल्याने निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुढे रुग्णांच्या नोंदणीसोबत छायाचित्र घेतली जाणार असून आधार नोंदणी प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. रुग्णांना दाखल करताना त्यांच्या हातावर नोंदणीचे बॅण्ड उपलब्ध केले जाणार असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत, असेही डॉ. शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेने बाळकुम येथे सुरू केलेल्या कोविड रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार पुढे आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदली झाल्याचे प्रकरणही उघडकीस आले. यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपने या प्रकरणी थेट राज्यपालांची भेट घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेतही यांमुळे अस्वस्थता होती. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी गुरुवारी पत्रकार परिषदत घेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या जातील याचीही माहिती दिली.

नव्याने उभारण्यात आलेल्या कोवीड रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहाण्यासाठी उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यामुळे समन्वयातील गोंधळ दूर होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला. ठाणे शहरातील कोविड नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असले तरी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचेही त्यांनी सांगितले.