ठाणे महापालिका आयुक्तांच्या दोन वर्षे मुदतवाढीचा सर्वपक्षीय ठराव मंजूर

ठाणे शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून विकासकामांचा धडाका लावणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी, अशास्वरूपाचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर करत राज्य सरकारकडे पाठविला आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात कोटय़वधी रुपयांच्या कामांची पेरणी करत जयस्वाल यांनी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याही विरोधाची धार बोथट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये जयस्वाल ओळखले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही संबंध मधुर बनले आहेत. या पाश्र्वभूमीवर आयुक्तांना मुदतवाढ देण्याचा हा ठराव सूचक मानला जात आहे. येत्या दोन महिन्यात शहरात तब्बल ५१० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदा निघणार आहेत. त्यामुळे या ठरावाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

येत्या जानेवारी महिन्यात जयस्वाल यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होताच राज्य सरकार सनदी अधिकाऱ्यांची बदली करत असते. मात्र, यापूर्वीही काही सनदी अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर काम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्यमंत्र्यांना यासंबंधीचे विशेषाधिकार असल्याने ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जयस्वाल यांना आणखी दोन वर्षे ठाण्यात काम करण्याची संधी दिली जावी, अशास्वरूपाचा ठराव सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे.

ठाणे आयुक्तपदाच्या सुरुवातीच्या काळात जयस्वाल यांचे राजकीय नेत्यांसोबत फारसे चांगले संबंध नव्हते. शिवसेना नेत्यांसोबत बिनसल्याने आलेल्या नैराश्यातून ते ४५ दिवसांच्या दीर्घ रजेवरही गेले होते. आता मात्र राजकीय नेत्यांना समाधानी ठेवण्याचे कसब जयस्वाल यांना अवगत झाले असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांशीही जयस्वाल यांनी चांगलेच जुळवून घेतले आहे. मध्यंतरी शहरातील मैदाने तसेच काही क्रीडा संकुले विनानिविदा बिल्डरांना भाडेपट्टय़ावर देण्याचे वादग्रस्त प्रस्ताव जयस्वाल यांनी मांडले होते. त्यास भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या जयस्वाल यांच्यापुढे केळकर यांचेही फार काही चालत नसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जयस्वाल ठाण्यातच राहावेत यासाठी मुख्यमंत्र्यांची मनधरणी सुरू  केली आहे.

मी सर्वसाधारण सभेच्या भावनांचा आदर करतो. असे असले तरी सरकारी अधिकारी असल्यामुळे माझ्याविषयी राज्य सरकार योग्य काय ते निर्णय घेतील. शहराचा कायापालट करू शकतील असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या निर्णायक टप्प्यावर आहेत याची मला कल्पना आहे. मात्र, माझी बदली झाली आणि नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात विकासाचा हा दृष्टिकोन बदलेल असे मला अजिबात वाटत नाही.   – संजीव जयस्वाल, आयुक्त

महापालिका आयुक्त म्हणून जयस्वाल यांनी तीन वर्षांत ठाणे शहराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी आखलेले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यासाठी जयस्वाल यांच्यासारखा खमक्या आणि झोकून काम करणारा अधिकारी ठाण्यात असणे काळाची गरज आहे.  – नरेश म्हस्के, सभागृह नेते