ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून टाळेबंदीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी करोनातून बरे झालेल्या नागरिकांची भेट घेऊन पालिकेच्या सुविधेत काही बदल करणे अपेक्षित आहे, याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय शहराचा दौरा सुरू केला आहे. त्यामध्ये ते नागरिकांशी संवाद साधून ते शहरातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

बुधवारी त्यांनी कोपरी-पाचपखाडी भागाचा दौरा केला. त्या दरम्यान त्यांनी करोनातून बरे झालेल्या पाच ते सहा नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये करोनावर कशी मात केली, पालिकेच्या सुविधा कशा होत्या आणि त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, याबाबत त्यांची मते जाणून घेतली. याशिवाय, घरामध्येच विलगीकरणात असलेल्या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अत्यवस्थ वृद्धाची रुग्णालयात व्यवस्था

या दौऱ्यादरम्यान कोळीवाडा परिसरातील रस्त्यावर एक वृद्ध झोपलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर आयुक्तांनी त्यांची गाडी थांबविली आणि त्यानंतर त्या वृद्धाला तात्काळ पाणी दिले. पोटभर अन्न न मिळाल्याने अशक्तपणा आल्याचे लक्षात येताच त्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्या वृद्धाला कळवा रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.