संजीव जयस्वाल आयुक्त/निवडणूक अधिकारी, ठाणे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

महापालिका निवडणुकांसाठी आता अवघा आठवडा उरला आहे. विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी साधलेला संवाद..

* ठाण्यात यंदा पॅनल पद्धतीची निवडणूक आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारी कशी आहे? 

या वेळी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रभागामध्ये ४ उमेदवारांचे पॅनल पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये अ, ब, क, ड अशा पद्धतीने चार उमेदवारांचे एक पॅनेल राहणार आहे. या चार जागांसाठी मतदान केंद्रावर कमीतकमी दोन व जास्तीत जास्त चार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असणार आहेत. या यंत्रावर चार जागांच्या उमेदवारांची आखणी करण्यात येणार आहे. कदाचित ज्या प्रभागामध्ये उमेदवारांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी एकाच यंत्रावर दोन जागांच्या उमेदवारांची किंवा तीन यंत्रांवर एकूण चार जागांच्या उमेदवारांची आखणी करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना त्यांच्या पसंतीच्या चार उमेदवारांना मतदान करता येऊ शकते.

*  या नव्या पद्धतीनुसार मतदारांच्या मनात काही शंका आहेत. मतदान करताना चारही जागांवर मतदान करणे अनिवार्य आहे का? एखाद्या जागेवर मतदान करायचे नसेल तर मतदान प्रक्रिया पूर्ण होईल का? किंवा चारपैकी काही जागांवर नोटासारखा पर्याय निवडता येऊ शकेल का?

या नवीन प्रक्रियेद्वारे चारही जागांवर मतदान करणे अनिवार्य आहे. जोपर्यंत चारही जागांवर मतदान केले जात नाही, तोपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. यापूर्वी आपण मतदान करायला जातो, तेव्हा यंत्रावरील एक बटन दाबले की बीप असा आवाज होतो. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा तो संकेत आहे. पॅनलपद्धतीत जोपर्यंत एखादा मतदार प्रत्येक गटात एक अशी चार मते देत नाही, तोपर्यंत बीप असा आवाजच होणार नाही. त्यामुळे मतदारांना अ, ब, क, ड या गटांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग यंत्रावर आखणी केली आहे. त्याप्रमाणे मतदान करावे लागणार आहे. मात्र एखाद्या मतदाराला एखाद्या उमेदवारांस मतदान करण्याची इच्छा नसेल त्या वेळी यंत्रावर नोटा म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय निवडण्याची मुभा आहे. ते बटन दाबल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. नोटा म्हणजेच वरीलपैकी कुणीही नाही हा पर्याय प्रत्येक यंत्रावर देण्यात आला आहे. मतदानाचा सर्वाधिकार आपल्याला असला तरी चार ठिकाणी मतदान करणे मात्र बंधनकारक आहे.

*  चारही मते एकाच पक्षाला देणे बंधनकारक आहे असा गैरसमज काही ठिकाणी प्रचारादरम्यान पसरविण्यात येत आहे. त्याबद्दल निवडणूक यंत्रणा काय करते आहे. तसेच यासंबंधी नेमके मार्गदर्शन कराल का?

तसे अजिबात नाही. मतदाराला या चार जागांपैकी कुणालाही मत देता येऊ शकते. एकाच पक्षाच्या उमेदवारांना मतदान देणे बंधनकारक आहे हा गैरसमज लोकांनी मनातून काढून टाकावा. जार जागांवरील त्यांच्या पसंतीच्या कुठल्याही उमेदवारास त्यांना मतदान करता येऊ शकते. फक्त चारही ठिकाणी त्यांना मतदान करणे बंधनकारक आहे. कारण त्याने तीनच मते दिली आणि चौथे मत दिले नाही तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि त्याचे मत गणले जाणार नाही. अशा वेळी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना संबंधित मतदारास नोटा या पर्यायाविषयी सागण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  काही मतदार नोटाचा वापर करण्यासही टाळाटाळ करतात किंवा मतदान करत नाहीत. अशा वेळी पोलिंग एजंट यांच्या उपस्थित केंद्राधिकाऱ्यांच्या डायरीत तशी नोंद करण्यात येते व ते मत गणले जात नाही. याबाबत सर्व प्रशिक्षण वर्गातून संबंधित मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व मतदान केंद्रावरील इतर कर्मचारी यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. मतदाराने जर तीनच उमेदवारांना मत दिले आणि चौथ्या उमेदवारास मतदान न करताच तो मतदान केंद्राच्या बाहेर जात असेल तर त्याला थांबवून नोटा या पर्यायाविषयी समजून सांगून तो पर्याय निवडून मतदान प्रRि या पूर्ण करण्याविषयी त्याला सूचना देण्यात आल्या आहेत.

*  एकूण मतदान केंद्र किती आहेत ?

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १३३ जागांसाठी एकूण ८०५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत मतदारांना व्यवस्थितपणे मतदान करता यावे यासाठी एकूण १,७०४ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदारांना येण्याजाण्यासाठी सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधित विभागाच्या लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

* मतमोजणी केंद्रांची व्यवस्था कशी आहे आणि साधारपणे निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहे?

या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय एकूण ११ ठिकाणी मतमोजणी ठेवण्यात आली आहे. साधारणत: प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तीन प्रभाग अशा पद्धतीने मतमोजणी व्यवस्था करण्यात आली आहे. माजिवडे आणि कळवा येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी चार प्रभाग आहेत. मुंब्रा येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन प्रभाग आहेत तर उर्वरित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी ३ प्रभाग आहेत.

सर्वसाधारणपणे प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तीन तीन प्रभाग आहेत. आपण प्रभागनिहाय मतमोजणी करणार असल्याने प्रत्येक प्रभागासाठी अंदाजे दीड तास एवढा कालावधी आम्ही अपेक्षित धरला आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली तर दुपारी तीनपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल लागलेले असतील.

मुलाखत:  जयेश सामंत