ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, मेट्रो प्रकल्पांची पेरणी

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे व आसपासच्या शहरांमधील दळणवळण सुविधांसाठी आखलेल्या मोठय़ा वाहतूक प्रकल्पांना शहरांतर्गत मेट्रो, ‘बीआरटीएस’, जलवाहतूक अशा स्थानिक प्रकल्पांची जोड देणारा आणि ठाणे, कळवा, दिवा या शहरांत रस्ते व उड्डाणपुलांचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करणारा आगामी वर्षांचा अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी स्थायी समितीकडे सादर केला.

एकूण तीन हजार ८६१ कोटी रुपयांच्या जमा-खर्चाच्या या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जयस्वाल यांनी गेल्या काही वर्षांपासून आखलेल्या हजारो कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा फलनिष्पत्ती अहवाल ठाणेकरांपुढे सादर केला. त्याच वेळी ठाणेकरांवर करवाढ न लादत जयस्वाल यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही दिलासा दिला.

ठाणे महापालिका आयुक्त म्हणून सलग पाचवा अर्थसंकल्प मांडताना जयस्वाल यांनी गेल्या काही वर्षांत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे शिवाय नव्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न यंदा केला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्यासह भिवंडी, कल्याण, डोंबिवली या भागांत आखलेल्या मोठय़ा प्रकल्पांना पूरक ठरणारे वाहतूक प्रकल्प हे अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ आहे. खाडीकिनारी उड्डाणपूल, घोडबंदर मार्गाला पर्यायी रस्ता तसेच दिवा-आगासन पट्टय़ातील सुविधांचा आणि दळणवळणाच्या सक्षमीकरणासाठी प्रकल्पांची घोषणाही या अर्थसंकल्पात नव्याने करण्यात आली आहे.

दळवळण सुविधा प्रकल्प..

५० कोटींची तरतूद करून  ठाणे-कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण करणार.

१२ कोटी खर्चून  चार नव्या पादचारी पुलांची उभारणी.

१८ कोटींची तरतूद.  खारेगाव आणि दिवा रेल्वे मार्गावर पूल उभारणीसाठी

५६ कोटींची तरतूद.  दिवा-शीळ परिसरातील खिडकाळी, पडले, सागर्ली भागातील वाहतुकीसाठी देसाई खाडीवर पूल.

वाहनतळ सुविधा

ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयाशेजारी असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील ११३५७.२३ चौरस मीटर सुविधा भूखंडावर १६०० चारचाकी वाहनांसाठी तळ अधिक दहा मजल्याचे सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असल्यामुळे महापालिकेच्या खर्चात ११९ कोटी रुपयांची बचत झाली आहे. कशीश पार्क येथील सुविधा भूखंडावर वाहनतळासहित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले  आहे.

रस्तेबांधणीला प्राधान्य

* शहरातील डांबरी रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

* ठाणे शहरातील ५७ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार.

* पालिकेच्या विकास आराखडय़ानुसार आखलेल्या रस्ते प्रकल्पांसाठी ४०३ कोटींची तरतूद.

* रस्तेकामांचे उद्दिष्ट गतवर्षीच्या ७२ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांवर नेणार.

पहिले मत्स्यालय

गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले शहरातील पहिलेवहिले मत्स्यालय गोल्डन डाइज नाका येथे अग्निशमन केंद्रालगत उभारण्याचे नक्की करण्यात आले आहे.

मुंब्य्रात हज हाऊस

मुंब्रा भागात हज हाऊसच्या उभारणीसाठी महापालिका दहा कोटी रुपयांचा निधी देणार असून ही उभारणी हज कमिटी ऑफ इंडियामार्फत केली जाणार आहे.

ठाणे पूर्वेकडे ‘सॅटिस’

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात होणारी कोंडी दूर करण्यासाठी आखण्यात आलेल्या सॅटिस प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल, अशी घोषणा जयस्वाल यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आखण्यात आलेला हा प्रकल्प २६५ कोटी रुपयांचा आहे.