महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा इशारा
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील रस्ते तसेच दुकानांसमोरील मोकळ्या जागांमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम १५ दिवसांत स्वखर्चाने काढा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. विकास आराखडय़ात ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक इमारतीला रस्ताभिमुख मार्जिनल जागा मंजूर करण्यात येते. मात्र, इमारतीसमोरील या मोकळ्या जागांमध्ये बेकायदा बांधकामे उभी करून व्यवसाय थाटणाऱ्यांची संख्या काही हजारोंच्या घरात आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रस्तारुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालविल्यानंतर इतर भागांतील बेकायदा बांधकामधारकांना महापालिकेने इशारा दिला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर झालेल्या विकास आराखडय़ाचे जागोजागी उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गेल्या २० वर्षांत अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेले शहरातील सुमारे २५० पेक्षा अधिक भूखंड बांधकाममाफियांनी गिळंकृत केले. महापालिका मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामांचे नकाशे मंजूर करते. त्यानुसार सेक्टरनिहाय व अनुज्ञेय वापरानुसार रस्ताभिमुख मार्जिनल जागा मंजूर करण्यात येते. या मोकळ्या जागेमध्ये अनेक वसाहती तसेच व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील अशा बांधकामांवर हातोडा चालवून रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय पोखरण रस्ता, कळवा परिसरात रस्त्याची जागा बळकाविणाऱ्या बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. पुढील टप्प्यात खोपट तसेच शहरातील इतर भागांमधील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल. रस्ते रुंदीकरणास अडथळा निर्माण करणाऱ्या गाळेधारकांची संख्या पालिका हद्दीत मोठी आहे. त्यामुळे मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत स्वखर्चाने काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.