घोडबंदर येथील वाघबीळ परिसरात चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या प्रदीप नारायण भोईर या तरुणाचे प्राण वाचवत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. शनिवारी हा अपघात घडला. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेत प्रदीपला रुग्णालयापर्यंत नेत असताना आयुक्तांना त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर योगायोगाने तो महापालिकेचा कर्मचारी निघाला. महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये प्रदीप काम करीत असून आयुक्तांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्याला पुर्नजन्म मिळाला.
ठाणे महापालिकेच्या फायलेरीया विभागामध्ये प्रदीप भोईर कार्यरत असून शनिवारी दुपारी तो दुचाकीवरून घोडबंदर रस्त्याने जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात जखमी झाल्याने तो मदतीसाठी याचना करत होता, मात्र त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे येत नव्हते. त्याचवेळेस ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हे नवी मुंबईला एका कार्यक्रमासाठी तेथून जात असताना त्यांची नजर त्याच्याकडे गेली. त्याला जखमी अवस्थेत पाहून आयुक्त जयस्वाल यांनी तातडीने गाडी थांबविली आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्याला स्वत:च्या गाडीतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. रुग्णालयामध्ये त्याला नेत असतानाच आयुक्त जयस्वाल यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांना बोलावून घेतले. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ डॉ. केंद्रे रुग्णालयात पोहचले आणि त्यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

चार मद्यपींना दंड
ठाणे महापालिका मुख्यालयात सोमवारी अचानकपणे दौरा करत असताना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार मद्यपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नौपाडा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून १२०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हे चौघेजण विचित्र हावभाव करित होते. दौऱ्यादरम्यान त्यांच्याकडे नजर जाताच आयुक्तांनी त्यांची विचारपूस केली. त्यावेळी चौघांनी मद्य प्राशन केल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्तांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने चौघांना पकडून नौपाडा पोलिसांच्या हवाली केले.