News Flash

दिव्यातील कारवाईला स्थगिती

नागरिकांनी रस्ता अडवून  कारवाईसाठी आलेल्या पथकाला विरोध केला.

नागरिकांच्या विरोधापुढे प्रशासनाची माघार; बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करणार

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील दिवा येथील साबे परिसरात कचराभूमीलगत कांदळवनांवर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यास गेलेल्या जिल्हा तसेच महापालिका प्रशासनास मंगळवारी स्थानिक रहिवाशांच्या जोरदार विरोधाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी रस्ता अडवून  कारवाईसाठी आलेल्या पथकाला विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाने माघार घेतली. या बांधकामांचे नव्याने सर्र्वेक्षण करून दहा दिवसांनंतर कारवाई करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

दिवा येथील साबे गाव भागातील सव्‍‌र्हे क्रमांक २३६, ७९, ८० आणि ७५ या जमिनीवर कांदळवने तोडून त्या ठिकाणी शेकडो बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. या बांधकामांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने ही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार   जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन या बांधकामांवर कारवाईसाठी  साबे भागात मंगळवारी दाखल झाले. या वेळी हजारो नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला. रहिवाशांनी त्या चाळींपर्यंत जाणारे सर्व रस्ते अडवले. तर, काही जणांनी जेसीबी मशीनच्या समोर आडवे होत कारवाईचा निषेध केला. नागरिकांच्या विरोधामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई दहा दिवस पुढे ढकली आहे. साबे गावातील तोडण्यात येणाऱ्या चाळींचे जिल्हा प्रशासनातर्फे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ‘यापूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आम्हाला बाजू मांडता आली नाही. त्यामुळे आमची बाजू मांडता यावी यासाठी न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात येईल,’ असे दिवा भाजप सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी सांगितले.

सर्वपक्षीय नेते एकत्र

चाळींवर ही कारवाई होऊ नये, तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना काही वेळ देण्यात या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते दिव्यात एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वेळी मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना नगरसेवक आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि भाजपचे दिवा भागातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

साबे गाव येथील कारवाईला नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात विरोध केला आहे. तसेच आम्हाला आमची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी काही वेळ द्यावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे ही कारवाई दहा दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

– अधिक पाटील, तहसीलदार, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:53 am

Web Title: thane municipal commissioner stop action against illegal construction at diva zws 70
Next Stories
1 कर्जमुक्तीसाठी शेजारी राहणाऱ्या वृद्धेची हत्या
2 येऊर वनक्षेत्रात ‘रात्रीस खेळ बंद’
3 ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी शेवटची तालीम
Just Now!
X