मद्यविक्रेते, सराफांची चार वर्षांपूर्वीची जकात अद्याप थकीत

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत भर पडून विविध विकासकामे हाती घेता यावीत, याकरिता पालिका प्रशासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांवर करांचा वाढीव बोजा लादला जात असताना जकात उत्पन्नापोटी मिळणाऱ्या अडीचशे कोटींच्या रकमेकडे पालिकेने गेल्या चार वर्षांपासून कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिका हद्दीतील मद्य विक्रेत्यांकडून २२९ कोटी २४ लाख तर सराफांकडून १५ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी पालिकेने अद्याप वसूल केलेली नाही. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील जकात वसुली बंद होऊन आता चार वर्षे होत आली तरी त्याआधीची ही थकबाकी मिळवण्याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

ठाणे महापालिकेमार्फत शहराच्या प्रवेशद्वारांवर जकात वसुली केली जात होती. अनेक व्यापाऱ्यांनी जकात चुकविल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये मद्य विक्रेते आणि सराफांचा समावेश होता. त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांची जकात वसुली शिल्लक असतानाच २०१३ मध्ये राज्य शासनाने जकात कर रद्द करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला. स्थानिक संस्था कर लागू झाल्यानंतरही जकातीपोटी थकीत असलेली रक्कम वसूल करावी, असे स्पष्ट निर्देश यापूर्वीच राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार पालिकेने मध्यंतरी अभय योजना राबवली. मात्र, त्यालाही मद्यविक्रेते व सराफांनी प्रतिसाद दिला नाही.

मद्य विक्रेत्यांकडून २२९ कोटी २४ लाख एक हजार ६९२ रुपये तर सराफांकडून १५ कोटी ९६ लाख ५१ हजार ७३२ रुपये जकात वसुलीपोटी मिळणे अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम मिळवण्याकडे पालिकेनेही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या रकमेची वसुली झाली असती तर शहराच्या विकासकामांमध्ये उपयोगी पडली असती, असे ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी संजीव साने यांनी सांगितले.

सविनय कायदेभंगाचा इशारा

गेल्या चार वर्षांपासून ही रक्कम थकीत असतानाही तिच्या वसुलीसाठी महापालिकेकडे कोणतीही योजना नाही. त्यामुळे या रकमेच्या वसुलीसाठी प्रशासनाची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी संजीव साने यांनी केला आहे. तसेच या रकमेच्या वसुलीसंदर्भात न्यायालयामध्ये काही दावे दाखल झाले असून हे दावे निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्य न्यायाधीशांकडे विनंती करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. शहरातील नागरिकांनी मद्य तसेच सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर असलेल्या कराची रक्कम भरली आहे. त्यामुळे मद्य विक्रेते आणि सराफांकडून थकीत जकात वसुली झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच येत्या १ नोव्हेंबपर्यंत महापालिकेने वसुलीबाबत आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा सविनय कायदेभंगाचे अभिनव आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.