कशेळी, काल्हेरमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव

ठाणे महापालिका हद्दीलगत असलेल्या कशेळी आणि काल्हेर भागात उभ्या राहिलेल्या ७५ निवासी बेकायदा इमारतींना टाळे ठोकण्याची कारवाई उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र या भागातील शेकडोंच्या संख्येने उभ्या राहिलेल्या इमारती अधिकृत भासवून लाखो रुपयांना विकल्या गेल्याने शेकडो ग्राहक नाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाण्याच्या घोडबंदर भागात आडमार्गाला असलेल्या घरांचे दर प्रति चौरस फुटाला सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. असे असताना कशेळी, काल्हेर, खारबाव परिसरात मेट्रोचे गाजर दाखवीत कोणतीही परवानगी नसलेल्या इमारतींमधून घरांची विक्री प्रति चौरस फुटास चार ते पाच हजार रुपयांनी होत असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. सोमवारी यापैकी अशाच काही इमारतींना जिल्हा प्रशासनाने टाळे ठोकले. भिवंडी-नाशिक मार्गावर असलेल्या घरांच्या अधिकृत घरांचे दरही यापैकी काही घरांपेक्षा स्वस्त असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या भागातील नवी शर्तीच्या जमिनींची हद्द निश्चित करण्यासाठी जागेची मोजणी करण्याचे काम मंगळवारी जिल्हा प्रशासनाने सुरू केले असून त्यात आणखी २० ते २५ अशा प्रकारच्या इमारती समोर येण्याची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे कशेळी-काल्हेर भागात घरे खरेदी करणारे ग्राहक धास्तावल्याचे चित्र आहे. या भागातील खाडीकिनारी परिसराजवळ असलेल्या नव्या शर्तीच्या जमिनींवर मैत्री पार्क नावाचे गृहसंकुल उभारण्यात आले असून या गृहसंकुलामध्ये ७५ निवासी अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत तर काही बांधकामे अपूर्णावस्थेत आहेत. या बेकायदा इमारतींना टाळे ठोकण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून हाती घेतली आहे. या कारवाईत मंगळवारी इमारतींचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. तसेच ज्या इमारती अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यांची कागदपत्रे तपासून त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तर उर्वरित ज्या इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत, त्या शासन जमा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले. तसेच या बांधकामासाठी ग्रामपंचायत, पालिका वा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे या भागातील नवी शर्तीच्या जमिनींची हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये आणखी २० ते २५ अशा बेकायदा इमारती पुढे येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

एका घराला २५ लाख

मैत्री पार्कमधील ‘त्या’ इमारती अधिकृत असल्याचे सांगत विकासकांनी त्यासंबंधीची कागदपत्रे दाखविल्यामुळे घराची खरेदी केल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. मात्र, या कारवाईच्या धक्क्यामुळे मन:स्थिती योग्य नसल्याचे सांगत ग्राहकांनी याविषयी अधिक बोलण्यास तसेच अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चार हजार पाचशे रुपयांपासून पुढे प्रति चौरस फूट दराने सदनिकांची विक्री करण्यात आली असून ७५ इमारतींमधील ८० टक्के घरांची विक्री झाली आहे. या इमारतीमधील सदनिकांची चार हजार पाचशेपासून पुढे प्रति चौरस फूट या दराने विक्री झाल्याने पाचशे चौरस फुटाच्या एका सदनिकेची अंदाजे २२ ते २५ लाखांपर्यंत विक्री झाल्याचे सूत्रांकडून समजते.

जमिनी बळकावल्या

एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आलेल्या भिवंडीलगत असलेल्या गावांमध्ये खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. तिवरांची जंगले तोडून, मोकळ्या जमिनी बळकावून या भागात मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी ग्रामपंचायतींची परवानगी घेण्यात आली असली तरी खारबाव, कशेळी, काल्हेर यांसारख्या भागात बेकायदा नगरे उभी राहिल्याचे चित्र आहे.  ठाण्यालगत बेकायदा वस्त्यांमधून झालेला हा कोटय़वधी रुपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.