ठाण्यात महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी व्हेडिंग मशीन, रोजगार-स्वयंरोजगाराच्या योजना

ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाज कल्याण विकास विभागाने महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विविध योजनांची पेरणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे, महापालिका कार्यालये तसेच शाळांमध्ये सॅनिटरी व्हेडिंग यंत्र बसविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पांची घोषणा केली होती. येत्या महिनाभरात अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एटीएमच्या धर्तीवर सॅनीटरी व्हेडिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठरावीक रक्कम भरल्यानंतरच महिलांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे. ही रक्कम किती असेल याविषयी अद्याप पुरेशी माहिती देण्यात आली नसली तरी  साधारणपणे पाच रुपयांना ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगारच्या माध्यमातूनही विविध योजनांची आखणी करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी करून त्या ठिकाणी सुरक्षित निवाऱ्याची सोय केली जाणार आहे. या सर्व योजनांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक विकास विभागाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिला व बालकांसाठी दरवर्षी विविध योजना राबविण्यात येतात. आर्थिक स्तर सुधारून त्यांचे जीवनमान उंचवावे, या उद्देशातून योजनांची आखणी केली जाते. त्यामध्ये शिलाई मशीन, घरघंटी (पिठाची चक्की) तसेच घरगुती उद्योगासंबंधी उपकरणांचे वाटप करण्यात येत होते. यंदाही या योजना राबविण्यात येणार आहेत. मात्र दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या या योजनांच्या सोबतीला ठाणे शहरात प्रवास, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुविधांचाही महापालिकेने प्राधान्याने विचार केला आहे. शहरातील विविध भागांमध्ये महिलांसाठी प्रसाधनगृहांची उभारणी केली जावी, अशी मागणी विविध महिला संघटनांनी सातत्याने उचलून धरली आहे. त्यानुसार ठाणे, कळवा आणि मुंब्रा अशा महापालिका हद्दीचे भाग पाडत या ठिकाणी महिला स्वच्छतागृहांच्या उभारणीची कामे निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सुरू केली जाणार आहेत. याशिवाय मुलींना, महिलांना व बचत गटांना व्यावसायिक तसेच रिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणे, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारणे, शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे, रिक्षाचालक महिलांसाठी प्रसाधनगृहाची निर्मिती करणे, महापालिका व शासकीय कार्यालयांमध्ये बचत गटामार्फत उपाहारगृहाची निर्मिती करणे, महिलांसाठी समुपदेशन केंद्र, हेल्पलाइन, विधि सल्ला केंद्र चालविणे, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व बचत गटांसाठी उद्योजकता विकास शिबिरे आयोजित करणे, महिला व बालकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिरे घेणे आणि त्यामध्ये गंभीर आजार आढळल्यास औषधोपचारासाठी मदत करणे, अशा उपक्रमांचा समावेश आहे.

आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने निधीची तरतूद

सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कामे करण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेकरिता सॅनिटरी व्हेडिंग मशीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी असलेली महिलांची स्वच्छतागृहे, संपूर्ण शहरातील महिलांची स्वच्छतागृहे, महापालिका कार्यालये या ठिकाणी सॅनिटरी व्हेडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही मुलींकरिता सॅनिटरी व्हेडिंग मशीन बसविण्यात येणार असून त्यासाठी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

विकास आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

महिलांना कायदेविषयक, आरोग्यविषयक, कौटुंबिक सल्ला देण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यातून महिलांचे प्रश्न  सोडविणे. महिलांवरील अन्याय व अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांना कायदेविषयक सल्ला देणे, असेही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांसाठी हुंडा बंदी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार व अन्याय प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करणे तसेच महिलांचे आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास व जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रमही यंदा राबविण्यात येणार आहेत.