News Flash

खासगी कार्यालये, गृहसंकुलांत लसीकरण

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे जलदगतीने लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध पर्यायांवर विचार सुरू आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे महापालिकेचे लसीकरण धोरण जाहीर

ठाणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर रुग्ण उपचारासाठी सोयीसुविधा वाढविण्याबरोबरच आता खासगी लसीकरण केंद्रांमार्फत शहरातील खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासंबंधीचे धोरण महापालिकेने जाहीर केले आहे. या केंद्रांना लस उत्पादकांकडून लससाठा घ्यावा लागणार असून या केंद्रांवरील लसीकरण सशुल्क असणार आहे. तसेच या लसीकरणाचे दर ठरविण्याचे अधिकार संबंधित खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. या केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असणे बंधनकारक केले आहे. या धोरणामुळे पालिका लसीकरण केंद्रांवरील नागरिकांचा भार कमी होण्याबरोबरच नागरिकांची लसीकरणाच्या रांगांमधून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे जलदगतीने लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यामध्ये शहरातील खासगी रुग्णालयांमार्फत खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याच्या पर्यायावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ही मोहीम कशाप्रकारे राबवावी, याचे धोरण निश्चित करण्याचे कामही सुरू होते. अखेर शुक्रवारी महापालिकेने यासंबंधीचे धोरण जाहीर केले. ठाणे शहरात लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे आणि त्याचबरोबर करोना तिसऱ्या लाटेपूर्वी शहरात लसीकरण वेगाने करणे गरेजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खासगी लसीकरण केंद्रांमार्फत शहरातील खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासंबंधीचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या किमान दहा आणि त्यापेक्षा जास्त असेल तरच खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि अन्य गृहसंकुलांमध्ये खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. यामुळे लसींचा अधिकाधिक वापर होऊन अपव्यय टाळता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

धोरण कसे राबवणार?

  • या लसीकरण केंद्रांवर कार्यालयातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, गृहसंकुलातील रहिवासी, गृहसंकुलांत घरकाम करणारे, सुरक्षारक्षक तसेच इतर कामगार लसीकरणासाठी पात्र असणार आहेत.
  • या केंद्रांसाठी कार्यालय किंवा गृहसंकुल व्यवस्थापनाला एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे. त्याच्यावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून संबंधित खासगी रुग्णालयांना सादर करण्याची जबाबदारी असेल.
  • अशा केंद्रांवर संबंधित खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी शासकीय नियमानुसार प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
  • पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी  केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब होतो की नाही तसेच पात्र लाभार्थ्यांनाच लस मिळते की नाही आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे की नाही याची पाहाणी करणार आहेत.

नोंदणी करणे आवश्यक

खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी संबंधित खासगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोविन प्लॅटफार्मवर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्यानंतर महापालिका अशा रुग्णालयांना व्यवस्थापक म्हणून कोविन प्लॅटफार्म समाविष्ट करून घेणार आहे. शासन नियमाप्रमाणे व्यवस्था असलेल्या रुग्णालयांनाच या लसीकरण मोहिमेत सहभागी होता येणार आहे. कोविन अ‍ॅपवरील नोंदणीकृत रुग्णालये एक किंवा त्यापेक्षा जास्त कार्यालये आणि गृहसंकुलांना संपर्क करून त्यांच्याशी जोडले जाऊ शकतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:43 am

Web Title: thane municipal corporation announces vaccination policy ssh 93
Next Stories
1 कठोर र्निबधांतही भाजी मंडयांमध्ये गर्दी
2 रुग्णालयातच समुपदेशन
3 उल्हासनगरात तीन महिन्यांत ३४ लाखांची दंडवसुली
Just Now!
X